आमदारांच्या नाराजीच्या भीतीने मंत्रिमंडळ विस्तारही टप्प्याटप्प्याने?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/13-1.jpg)
महाईन्यूज | मुंबई
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. मात्र तीनही पक्षांच्या कोटय़ातील काही जागा रिक्त ठेवून हा विस्तार केला जाईल, असे सांगण्यात येते. सर्वच जागा भरल्या तर, मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून, दोन टप्प्यांत विस्तार करण्याचा विचार असल्याचे आघाडी सरकारमधील एका मंत्र्याने सांगितले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन होण्याआधी सत्तावाटपाबाबत निर्णय झालेला आहे. त्यानुसार शिवसेना १५, राष्ट्रवादी-१६ व काँग्रेसला १२ मंत्रिपदे वाटय़ाला येणार आहेत. मात्र तीनही पक्षांमध्ये मंत्रिपदासाठी इच्छुकांची मोठी गर्दी आहे. त्यामुळे सुरुवातीला मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबरोबर तिन्ही पक्षांतील सहा मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर विस्तार करून अन्य मंत्र्यांचा समावेश करण्याचे ठरले. परंतु तीनही पक्षांमधील वाद अजून मिटलेला नाही. त्यामुळे ज्यांनी शपथ घेतली, त्यांचे खातेवाटपही रखडलेले होते. अखेर दोन आठवडय़ांनंतर गुरुवारी सहा मंत्र्यांकडे त्या त्या पक्षाच्या वाटय़ाला येणाऱ्या खात्यांचे वाटप करण्यात आले.