‘आता बघूच… बाळासाहेबांचा शब्द महत्वाचा की सत्तेची लाचारी’, राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
![Let's see now… Balasaheb's word is important or powerlessness', Rane targets CM](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/udhav-नितेश-राणे.jpg)
मुंबई – औरंगबाद शहराचा उल्लेख शिवसेनेकडून आधीपासून संभाजीनगर असा केला जातो. आता शिवसेना राज्यात सत्तेत असल्याने औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करावे, अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने या नामांतराला विरोध केला आहे.
वाचा :-येणारे वर्ष आरोग्यदायी होण्यासाठी स्वयंशिस्तीचा निर्धार करा – मुख्यमंत्री
औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याचा कोणताही प्रस्ताव महाविकास आघाडीच्या समितीसमोर आला तर त्याला काँग्रेसचा विरोध असेल. किमान समान कार्यक्रमामध्ये नामांतरासारख्या बाबीचा समावेश नाही. अशा नामांतरामुळे सामान्यांचा विकास होतो असे मानत नाही. केवळ नामांतरच नाही तर घटनेतील प्रास्ताविकेमध्ये दिलेल्या मूल्यांची प्रतारणा होईल अशा कोणत्याही कृतीस कॉंग्रेसचा विरोध असेल, अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळसाहेब थोरात यांनी मांडल्यानंतर महाविकास आघाडीत ठिणगी पडली का ? अशी चर्चा सुरू झाली आहे.
यावरून आता भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरेंचा शब्द महत्त्वाचा की सत्तेची लाचारी, आता बघूच, अशा शब्दात भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
वाचा :-‘सीबीएसई’ दहावी, बारावीच्या परीक्षा ४ मेपासून
नितेश राणेंनी ट्विट केले की, काँग्रेसने सांगून टाकले संभाजीनगर होणार नाही! आता बघू..बाळासाहेबांचा शब्द महत्वाचा की सत्तेची लाचारी! संभाजी राजेंचा स्वाभिमान महत्वाचा की मुख्यमंत्री पदाची खुर्ची!
दरम्यान, स्मार्ट सिटीच्या कॅम्पेनिंगमध्ये संभाजीनगर नावाचा उल्लेख केल्यामुळे औरंगाबादेत पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली होती. आता काँग्रेसने नामांतरला उघड विरोध केल्याने महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल आहे का ? अशी चर्चा सुरू झाली आहे.