आज सकाळी पुन्हा एकदा नॉर्थ मुंबईत भूकंपाचे धक्के
![कोयनानगरला भूकंपाचे सौम्य धक्के, तर उस्मानाबादमध्ये भूगर्भातील हालचालींनी हादरली घराची छपरं](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/North-Of-MumbaiEarthquake.jpeg)
महाराष्ट्राला गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. तर आज पुन्हा एकदा नॉर्थ मुंबईत भूकंपाचे धक्के बसले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल असल्याचे म्हटले आहे. भूकंपाचे केंद्र मुंबईच्या उत्तर दिशेकडील 98 किमी दूर होते. हे धक्के पहाटेच्या वेळी 3.57 मिनिटांनी जाणवले होते. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा जीवितहानी झालेली नाही.
याआधी नाशिक येथे मंगळवारी दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले होते. मंगळवारी सकाळी 9.50 मिनिटांनी पहिल्यांदा 3.8 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. त्यानंतर 10.15 मिनिटांनी दुसरा 2.5 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के बसले होते. तर सोमवारी मुंबईपासून 102 किमी उत्तर भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. याची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल होती. राज्यातील विविध ठिकाणी सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, भूकंपाचे धक्के जाणवल्यास नागरिकांनी सावधानी बाळगावी. खिडक्या, दरवाजे किंवा उंच इमरातींपासून दूर रहावे. स्वत:ची जागा सोडण्यापूर्वी घरातील अन्य लोकांच्या सुरक्षिततेकडे सुद्धा लक्ष द्या. ऐवढेच नाही तर भूकंपाचे धक्के जाणवण्याच्या वेळी तुम्ही जर लिफ्ट मध्ये असाल तर लगेच त्या बाहेर पडा जेणेकरुन तुम्हाला दुखापत होणार नाही. त्याचसोबत ड्रायव्हिंग करत असल्यास गाडी रस्त्याच्या एका बाजूला लावत ती बंद करा. अशा काही गोष्टी लक्षात घेता भूकंपाच्या वेळी निर्माण होणाऱ्या समस्येपासून तुम्ही स्वत:चा बचाव करु शकता.