आघाडी सरकारने केलेल्या घोटाळ्याची माहिती CBIकडे गेली तर सर्व बाहेर येईल – किरीट सोमय्या
![CBI probe into Anil Parab, Milind Narvekar - Kirit Somaiya](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/kirit-somaiya.jpg)
मुंबई – ठाकरे सरकारने काल एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारच्या परवानगी शिवाय सीबीआयला तपासबंदी केली आहे. यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे.“सीबीआयला महाराष्ट्रात एन्ट्री नाही, असं ठाकरे सरकार म्हणत आहे. कारण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी केलेल्या घोटाळ्याबाबतची माहिती सीबीआयच्या हातात गेली तर सर्व बाहेर येईल, अशी त्यांना भीती वाटते”, असा घणाघात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
“शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी मिळून स्वत:च्या गुंडगिरीची काळजी घेण्यासाठी सीबीआयची सर्वसाधारण परवानगीचा निर्णय मागे घेतला आहे”, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. “सोशल मीडियावर कुणीही विरोधात बोललं तर हे सरकार त्याच्या घरी जाऊन त्याला मारहाण करतं. पत्रकारांनी आवाज उठवला तर त्यांना जेलमध्ये टाकलं जातंय”, असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे.
काय आहे प्रकरण?
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्षांने बुधवारी नवे वळण घेतले. राज्यातील प्रकरणांच्या तपासास केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) असलेली सरसकट अनुमती मागे घेत राज्य सरकारने सीबीआयला तपासबंदी केली. सुशांतसिंह प्रकरणाबरोबरच ‘टीआरपी’ घोटाळ्याचा तपासही मुंबई पोलिसांकडून काढून स्वत:कडे घेण्याचा सीबीआयचा प्रयत्न राज्य सरकारने निष्फळ ठरवल्याचे मानले जाते.
राज्याच्या गृहविभागाने याबाबत बुधवारी आदेश काढला. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करीत होते. मात्र, या प्रकरणात मुंबई पोलीस सत्ताधाऱ्यांशी सबंधितांना वाचवत असल्याचा आरोप सुरू झाला. त्यानंतर या प्रकरणात बिहारमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून घेऊन सीबीआयकडे सोपविण्यात आला. कालांतराने सर्वोच्च न्यायालयानेही हा तपास सीबीआयकडे कायम ठेवला. मात्र, या प्रकरणात मुंबई पोलीस आणि राज्य सरकारची प्रतिमा मलिन झाल्याने केंद्राच्या भूमिकेबाबत महाविकास आघाडी सरकारमध्ये नाराजी होती.