आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूच्या घरावर अतिक्रमणाचा हातोडा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/FOOTBALL-merry-naidu.png)
मुंबई – धारावीत फुटपाथवर राहून कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या फुटबॉलपटू मेरी नायडूला सध्या संघर्ष आणि परिस्थिती अशा दोन्ही गोष्टीचा सामना करावा लागतोय. परिस्थितीवर मात करून मेरी नायडू आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली मात्र सध्या निर्माण झालेली आर्थिक अडचण आणि बेघर झालेली अवस्था या दोन्हीमुळे ती निराश झाली आहे. दीड वर्षांपूर्वी मेरी नायडूचा पंतप्रधान याच्या हस्ते गौरव करण्यात आला.
त्यानंतर ती धारावीत फुटपाथवर झोपडपट्टीत राहत असल्याने तिला मदतीचे आवाहन करण्यासाठी अनेक नेत्यांनी हात पुढे केले. मात्र, दीड वर्षानंतरदेखील तिला कोणत्याही प्रकारची मदत न मिळाल्याने तिचे कुटुंब सध्या अनेक अडचणींना तोंड देत आहेत.
मेरी प्रकाश नायडू, वय वर्षे 17. पण या कमी वयात फुटबॉल खेळत तिने खूप यश मिळवलं. धारावीतल्या छत्रपती शिवाजी महाराज हायस्कुलमध्ये मेरी 10 वी पर्यंत शिकली. या कालावधीत तिने तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि मग आंतरराष्ट्रीय पातळीवर मजल मारली. 2017 साली मेरीचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गौरव करण्यात आला. पण त्यानंतर तिच्या आयुष्यात संकटांचं जणू वादळाच आलं. फुटपाथवर राहत असलेलं घर हे बेकायदेशीर असल्याने वारंवार महानगरपालिका त्यांच्या घरावर अतिक्रमणाची कारवाई करते. ‘बेटी पढाओ, बेटी बचाव’ असा नारा देणाऱ्या भाजप सरकारच्या काळात सध्या एक मुलगी ताकदीच्या जोरावर सगळ्या गोष्टींचा सामना करत आहे.
मेरीने केलेल्या कामगिरीनंतर तिच्या मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावले. वडील महानगरपालिकेच्या सफाई विभागात कंत्राटी कामगार म्हणून काम करतात. तुटपुंज्या पगारावर घर चालवावे लागत असल्यामुळे तीन मुली आणि घरचा खर्च उचलण्यात अनेक अडचणी येत असल्याचे तिची आई सांगते. मेरीने आतापर्यंत मिळवलेली अनेक प्रमाणपत्र, गळ्यातील कमावलेली मेडल्स सध्या या झोपडीत धूळ खात पडली आहेत. गेल्या दीड वर्षात तिच्या घरावर चार वेळा अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये हजारो रुपयांचे नुकसान झाले.
परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या मेरीच्या आयुष्यात संकटांची कमी नाही. आश्वसनं फक्त आश्वसनं राहिली असून आम्हाला या दीड वर्षात कुणीही विचारलं नसल्याची खंत मेरीच्या आईने व्यक्त केली. फुटबॉल क्षेत्रात देशाचे प्रतिनिधित्व करु पाहणाऱ्या मेरीला सध्या मदतीची आवश्यकता आहे. आर्थिक अडचण आणि घरावर वारंवार होणारे अतिक्रमण यामुळे यंदा अकरावीत असणारी मेरी गेल्या वर्षभरापासून शाळेतच गेली नाही.
दीड वर्षांपूर्वी मेरीला सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मेरीच्या कुटुंबियांना सगळ्या समाजमाध्यमांसमोर बोलावलं होतं आणि मेरीला जमेल तितकी मदत करुन सहकार्य करु असं आश्वासन दिलं होतं. मात्र, दीड वर्षानंतर देखील मेरीच्या पदरात एक रुपया देखील पडला नाही. खेळाडूंसाठी धावून येणारे राज्याचे क्रीडा मंत्री मेरीच्या बाबतीत अगदीच उदासीन असल्याचं पाहायला मिळत आहे. मेरीला सध्या हक्काचा निवारा आणि शिक्षणाची गरज आहे. त्यामुळे नुसती अश्वसनं न देता मदत मिळावी याची वाट मेरी आणि तिचे कुटुंब पाहत आहे.