‘अॅक्सिस बॅंके’तील ती खाती बळवणार, ठाकरे सरकारच्या हालचालींना वेग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/45.jpg)
मुंबई| महाईन्यूज
राज्यात सत्तापालट झाल्यानंतर याचा सर्वात मोठा फटका भारतात ‘टॉप 5’मध्ये असलेल्या ‘अॅक्सिस बँके’ला बसण्याची शक्यता आहे. पोलिस विभागाची वेतन खाती (सॅलरी अकाऊण्ट्स) अॅक्सिस बँकेतून हलवण्याच्या हालचाली ठाकरे सरकारने सुरु केल्याची माहिती समजते. जवळपास दोन लाख पोलिसांची अकरा हजार कोटी रुपयांची खाती पुन्हा राष्ट्रीयकृत बँकेकडे वळवली जाण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे अॅक्सिस बॅंक महाराष्ट्र या मोठ्या ग्राहकाच्या अॅक्सेसमधून बाहेर जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र पोलिस दलात दोन लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या वार्षिक पगारापोटी 11 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कमेचा व्यवहार केला जातो. काही वर्षांपूर्वी पोलिस विभागातील बहुतांश वेतन खाती ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’कडून अॅक्सिस बँकेत हस्तांतरित करण्यात आली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ‘अॅक्सिस बँके’त उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे याचा संबंध जोडला जात होता.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारकडून ही खाती पुन्हा स्टेट बँकेसारख्या एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेकडे वळवण्याच्या हालचालींना जोर आला आहे. महिनाअखेरीस होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर यासंबंधी निर्णय होण्याची शक्यता आहे. प्रत्येक खात्याला मंत्री मिळाल्यानंतर हा बदल करण्यात येणार असल्याच्या ठाकरे सरकारच्या हालचाली दिसत आहेत.