अण्णा भाऊ साठे यांचे घाटकोपरमध्ये राष्ट्रीय स्मारक – गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/anna-sathe.jpg)
मुंबई | महाईन्यूज
घाटकोपर चिरागनगर येथील अण्णा भाऊ साठे यांचे वास्तव्य असणारे घर आणि परळ बीआयटी चाळमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असणाऱ्या घराच्या ठिकाणी गृहनिर्माण विभागामार्फत राष्ट्रीय दर्जाची स्मारके उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलेली आहे.
म्हाडाच्या मुंबईतील मुख्यालयात गृहनिर्माण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी म्हाडामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती आव्हाड यांनी घेतली . बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राष्ट्रीय दर्जाच्या स्मारकांची माहिती दिली. आव्हाड म्हणाले की, ‘दोन्ही स्मारकांसंदर्भात लवकरच पुढील कार्यवाहीला प्रारंभ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अण्णा भाऊ साठे यांचे वास्तव्य असणाऱ्या घराच्या ठिकाणी सद्य:स्थितीत राहात असलेल्या रहिवाशांचे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असणाऱ्या घराच्या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांचे पुनर्वसन मुंबईत प्रकल्पग्रस्त म्हणून शासनातर्फे इतरत्र करण्यात येणार आहे. या दोन्ही स्मारकांना पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात येईल.