breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमणार; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

मुंबई | प्रतिनिधी 
बृहन्मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमला जाणार, हे आता जवळपास निश्चित झालं आहे. केंद्र सरकारच्या कायद्यामुळे नगरसेवकांना मुदतवाढ देणं शक्य नसल्यानं काय निर्णय घेतला जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. अखेर राज्य सरकारने बृहन्मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे.

मुंबई महापालिकेच्या प्रभागरचना आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर मुंबई व उपनगरातील २३६ वार्डांच्या निवडणूक कधी जाहीर होणार याबद्दल वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहे. कारण ७ मार्च रोजी महापालिकेची मुदत संपत आहे. मात्र, निवडणूका एप्रिल अखेर किंवा मे मध्ये जाहीर केल्या जाण्याची शक्यता असून, तोपर्यंत नगरसेवकांना मुदतवाढ देणं शक्य नसल्यानं राज्य सरकारने प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत बृहन्मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमण्याची तरतूद नसल्याने तशी दुरुस्ती करून अध्यादेश काढला जाईल आणि ७ मार्चनंतर प्रशासक नेमला जाईल अशी माहिती कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं.

दोन वेळा देण्यात आली होती मुदतवाढ

मुंबई महापालिकेच्या आतापर्यंतच्या काळात दोन वेळा नगरसेवकांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. १९७८ आणि १९८५ अशी दोन वेळा नगरसेवकांना मुदतवाढ देण्यात आली होती. तसेच १९९० मध्येही अशाच पद्धतीने मुदतवाढ देण्यात आली होती.

१९९२ साली करण्यात आला कायदा

नगरसेवकांना अशा पद्धतीने मुदतवाढ देण्याविरोधात १९९२ मध्ये कायदा करण्यात आला. केंद्र सरकारने हा कायदा केलेला असून, तो महाराष्ट्रातही लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांना मुदतवाढ देता येत नाही.

इतर महापालिकांवरही प्रशासक

मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्चला संपत आहे. त्याचबरोबर राज्यातील इतर महत्त्वाच्या महापालिकांचीही मुदत संपणार आहे. ठाणे महापालिकेची मुदत ५ मार्चला संपणार आहे. पुणे महानगरपालिकेची मुदत १४ मार्च रोजी संपणार आहे. नागपूर महानगरपालिकेची मुदत ४ मार्च, तर नाशिक महापालिकेची मुदत १४ मार्चला रोजी संपणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची मुदत १३ मार्चला संपणार आहे. सोलापूर महापालिकेची ७ मार्च, अकोला महापालिकेची ८ मार्च, अमरावती महापालिकेचीही ८ मार्च रोजी, तर उल्हासनगर महापालिकेची ४ एप्रिलला मुदत संपणार आहे. त्यामुळे या महापालिकांवरही प्रशासक नेमले जाणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. नवाब मलिकांनी तशी माहिती दिली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button