Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

मुंबई मॅरेथॉनचे बिगुल वाजले; ‘हर दिल मुंबई’ नाऱ्यासह धावणार स्पर्धक, अशी करा नोंदणी

मुंबई: ज्या शहराला थांबणे ठाऊक नाही, त्या मुंबईला गेल्या दोन वर्षांत करोनाने थांबवले. या वर्षाच्या सुरुवातीला अर्धविराम घेतला होता, पण आता अवघी मुंबापुरी नवचैतन्याने सज्ज झाली आहे. याच उत्साहात आणखी भर टाकणार आहे ते ‘टाटा मुंबई मॅरेथॉन २०२३’चे आयोजन. जगभरातील धावपटूंचे आकर्षण असलेली ‘मुंबई मॅरेथॉन’ ही स्पर्धा आगामी वर्षात १५ जानेवारी, २०२३ रोजी मोठ्या दिमाखात होणार आहे. या स्पर्धेसाठी इच्छुकांनी नोंदणी करावी, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. यंदा मुंबई मॅरेथॉनचे हे १८वे वर्ष आहे.

बहुप्रतीक्षित आणि आशियातील प्रतिष्ठित मुंबई मॅरेथॉन पुन्हा नव्या जोमाने आणि नवीन आशा घेऊन परतली आहे. जागतिक ‘अॅथलेटिक्स एलिट लेबल रोड रेस’ नवीन वर्षाच्या तिसऱ्या रविवारी आयोजित करण्याची परंपरा आहे. हीच परंपरा आगामी वर्षात कायम राहणार आहे. ‘हर दिल मुंबई’ असे यंदाच्या स्पर्धेचे ब्रीद वाक्य आहे. मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक धावपटू आतुरतेने वाट पाहत होते. त्यांना आता या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

‘मुंबई मॅरेथॉनमध्ये पन्नास हजारांहून अधिक हौशी तसेच व्यावसायिक धावपटू जगभरातून सहभागी होतात. यंदाही मोठ्या संख्येने देशाच्या, जगाच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक सहभागी होतील, असा मला विश्वास आहे. सर्वांना एकाच मंचावर आणण्याठी मॅरेथॉन हे एक उत्तम माध्यम आहे. सामान्य नागरिकांसोबतच सेलिब्रिटी, लोकप्रतिनिधीही या मॅरेथॉनमध्ये सहभाग होतात. ही धाव आपल्या मुंबईच्या ऐक्याचे प्रतीक आहे’, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

सातत्याने दरवर्षी मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे स्पर्धक यंदा खूप उत्साही आहेत. ‘मी खूप उत्साहित आहे… ही माझी होम मॅरेथॉन आहे आणि माझ्यासाठी खूप खास आहे. आजवर प्रत्येक मॅरेथॉनमध्ये मी माझ्या नवऱ्यासोबत धावले आहे. करोनामुळे खंड पडलेली मुंबई मॅरेथॉन पुन्हा जाहीर झाल्याने मी खूप उत्सुक आहे’, असे ५४ वर्षीय मॅरेथॉनपटू निपा शेठ म्हणाल्या.

तर ‘तंदुरुस्तीची राहण्यासाठी मी नेहमी मॅरेथॉनमध्ये सहभागी होत असतो. मुंबई मॅरेथॉन मला नेहमीच नवी ऊर्जा देते. जगण्याचे नवे ध्येय ही स्पर्धा आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना देत असते’, असे ५५ वर्षीय ज्येष्ठ मॅरेथॉनपटू मधुर कोठारे म्हणाले.

नोंदणी सुरू…
हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे. ‘ओपन १० किलोमीटर रन’, ‘ड्रिम रन’ आणि ‘सिनियर सिटीझन रन’ची नोंदणी येत्या २६ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मॅरेथॉनमध्ये जास्तीत जास्त महिला धावपटूंना सहभागी करून घेण्यासाठी आयोजनकडून काही जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. स्पर्धेच्या tatamumbaimarathon.procam.in या संकेतस्थळावर सर्व विभागांसाठी धावपटूंना आपले नाव नोंदवता येईल. सोबतच ‘व्हर्च्युअल रन’ विभागासाठीही स्पर्धकांना देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होता येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button