Uncategorizedताज्या घडामोडीमराठवाडा

‘मोदी-फडणवीसांनी कारवाई केली तरी चालेल, पण शिवसेनेला साथ देणारच’; भाजप खासदाराचा निर्धार

अहमदनगर : राज्यात भाजप आणि शिवसेनेत टोकाचे राजकीय मतभेद निर्माण झालेले असताना नगरमध्ये मात्र भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी वेगळाच निर्धार केला आहे. ‘इतरत्र परिस्थिती काहीही असली तरी नगर जिल्ह्यात आपण शिवसेनेसोबत राहणार आहोत. यामुळे भले पक्षाने आपल्यावर कारवाई केली तरी चालेल,’ असं वक्तव्य डॉ. विखे पाटील यांनी केलं आहे. पारनेर तालुक्यातील एका पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात विखे पाटील बोलत होते. यावेळी शिवसेनेचे नेते विजय औटी यांच्यासह भाजप, शिवसेना आणि इतर पक्षांचे पदाधिकारीही उपस्थित होते.

आपल्या भाषणात डॉ. विखे पाटील यांनी पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचे नाव न घेता टीका केल, तर नगर जिल्ह्यातील शिवसेनेचं चांगलंच कौतुक केले. डॉ. विखे पाटील म्हणाले, ‘मी खासदार म्हणून निवडून येण्यात ५० टक्के वाटा येथील शिवसेनेचा आहे, याची मला जाणीव आहे. त्यामुळेच गेल्या तीन वर्षांच्या काळात मी कधीही शिवसेनेच्या विरोधात बोललो नाही. मातोश्रीच्या विरोधात, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधातही मी कधी बोललो नाही. माझे आजही हेच मत आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस ही शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यसभेच्या निकालावरून ते पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ठाकरे यांनी वेळीच सावध व्हावे, हे मी सांगत आहे, असं विखे यांनी म्हटलं आहे.

‘फडणवीस आणि मोदींनी कारवाई केली तरी चालेल…’

सुजय विखे पाटील यांनी शिवसेनेला मदत करणार असल्याचं सांगताना पक्षालाच आव्हान दिलं आहे. ‘माझे काही कार्यकर्ते शिवसेनेत गेले. मला त्याची खंत वाटली नाही. केवळ पारनेर तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातच भाजप आणि पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेशी एकनिष्ठ राहील. जेव्हा केव्हा शिवसेनेवर संकट येईल, तेव्हा मी या नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांना एकटे सोडणार नाही. यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर कारवाई केली तरी चालेल. असे बोलण्याची हिंमत ठेवणारा मी भाजपचा एकमेव खासदार आहे. ही हिंमत माझ्यामध्ये आहे, कारण मी येथील राजकारण ओळखतो. येथे विचारांचा वारसा आहे. तो वारसा टिकविण्यासाठी असे निर्णय घेणे आवश्यक आहे. यावर शिवसेनेची काय भूमिका असेल, हे मला सांगता येणार नाही. मात्र, शिवसेनेने येथे घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला माझा पाठिंबा असेल. गेल्या काळात पारनेर तालुक्यात शिवसेनेचा आमदार असताना मोठी कामे झाली. येणाऱ्या काळात कोणाची कशी आघाडी होणार हे माहिती नाही. मात्र, मी मात्र शिवसेनेसोबत राहण्यास ठाम आहे. यापुढे माझ्या तोंडून कधीही शिवसेनेवर टीका होणार नाही, याची ग्वाही देतो’, असंही डॉ. विखे पाटील म्हणाले.

सुप्रिया सुळे यांना टोला
शिवसेनेचे कौतुक करताना सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. या दोघांमध्ये एकदा लोकसभेत जुगलबंदी रंगली होती. त्यावेळी विखे पाटलांनी खाल्ल्या मिठाला जागावे, असे सुळे म्हणाल्या होत्या. तो धागा पकडून आज विखे पाटील म्हणाले, ‘कोणी तरी म्हटलं होते की आम्ही खाल्ल्या मिठाला जागत नाही. मी सांगतो की शिवसेनेने आम्हाला केलेल्या मदतीची जाणीव ठेवून मी शब्द देतो की यापुढील काळातही नगर जिल्ह्यातील शिवसेनेवर कधीही टीका करणार नाही. कारण आम्ही खाल्ल्या मिठाला जागतो. मात्र, जे कुटुंब आजपर्यंत कोणाच्याच मिठाला जागले नाही, त्यांच्या टीकेला आम्ही भीक घालत नाही,’ असंही डॉ. विखे म्हणाले.

सुप्रिया सुळेंनी सांगितलं देवेंद्र फडणवीसांच्या घरी जाऊन चर्चा करण्याचं कारण

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button