breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

पिंपरी-चिंचवड : आमदार महेश लांडगे यांनी आयुक्तांचे “कान टोचले”

आयुक्त शेखर सिंह यांना भूमिपुत्र, माजी नगरसेवकांचा विसर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर प्रशासनाला खडसावले

पिंपरी | प्रतिनिधी

भोसरी मतदार संघातील विविध विकास प्रकल्पांच्या कामाच्या लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचे कान टोचले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये प्रशासक राजवट सुरू आहे. प्रशासक व आयुक्त शेखर सिंह लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नेत्यांना विश्वासात घेत नाहीत, असा सूर आहे. यबाबत माजी नगरसेवक वारंवार तक्रार करत आहेत. त्यात आता थेट उपमुख्यमंत्री समोरच आयुक्तांची कान उघडणी केल्यामुळे प्रशासन व महापालिका अधिकाऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

चिखली येथील नवीन टाऊन हॉलमध्ये आयोजित विकासकामांच्या लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यावेळी आयुक्त सिंह यांनी प्रास्ताविक केले. त्यामध्ये त्यांनी विकासकामांचा खर्च, कामाची आवश्यकता याबाबत माहिती विषद केली. मात्र, ज्या नागरिकांनी विकासकामांसाठी जमिनी दिल्या. तसेच ज्या माजी नगरसेवकांनी कामे सुचवली त्यांची नावे घेतली नाही. त्यामुळे चिडलेल्या आमदार लांडगे यांनी आयुक्त सिंह यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच समाचार घेतला.

हेही वाचा     –      ‘भाजपाने ओबीसी समाजाला न्याय देण्याचे काम केले’; भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप 

आमदार लांडगे म्हणाले की, “सगळी कामे प्रशासन एकटेच करत नाही. प्रशासनाने सगळी कामे केली असती तर ही कामे दहा वर्षांपूर्वीच झाली असती. सन १९९७ ला गावे महापालिकेत समाविष्ट झाली. सन २०१७ नंतर जे नगरसेवक निवडून आले त्यांनी परिसरात विविध कामे सुचवली. तसेच, विविध प्रकल्प उभे राहण्यासाठी येथील भूमिपुत्रांनी जमिनी दिल्या. मात्र, प्रशासकांनी त्यांचा साधा नामोल्लेखही केला नाही. मी त्या सर्व माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि भूमिपुत्रांचे आभार व्यक्त करतो..” असे जाहीरपणे आमदार लांडगे यांनी आयुक्तांना सुनावले. त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या चिखलीतील ग्रामस्थांनी लांडगे यांच्या भूमिकेचे टाळ्या वाजवून कौतुक केले.

विकासकामात लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील महापालिकांच्या दोन वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाहीत. शहराच्या विकासाचा कारभार प्रशासक करत आहेत. शहरांचा विकास हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या दोन चाकांवर चालत असतो. त्यामुळे विकासाच्या कामाला अधिक गती प्राप्त होते. त्यामुळे माजी नगरसेवक, लॊकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच कामे केली जावीत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्तांना बजावले. विशेष म्हणजे, आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी सुचवलेली एक हजार नव्हे, तर आणखी पाच हजार कोटीची विकासकामे आणि मार्गी लावण्यास तयार आहोत, असे जाहीरपणे स्पष्ट करत लांडगे यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा असल्यावर शिक्कामोर्तब केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button