breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मिशन-२०२२ :  महापालिका विरोधी पक्षनेतापदासाठी गव्हाणे, कलाटे, शिलवंत, घोडेकर ‘डार्क हॉर्स’

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत पक्षनेता बदलाचे संकेत

राजू मिसाळ यांच्याजागी कुणाची वर्णी लागणार?

 

पिंपरी । अधिक दिवे

पिंपरी-चिंचवड महापालिका विरोधी पक्षनेते राजु मिसाळ यांचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. त्यानंतर नवा विरोधी पक्षनेतेपदाचा चेहरा कोण? याची उत्सुकता शिगेला पोचली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडूनही पक्षनेता बदलाचे संकेत मिळत आहेत. सध्या पक्षातून ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे, मयुर कलाटे, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर आणि माजी महापौर तथा नगरसेविका वैशाली घोडेकर यांच्या नावाची चर्चा आहे. विरोधी पक्षनेतेपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत विरोधी पक्षनेतेपदाची संधी देताना ‘एक वर्ष- एक विरोधी पक्षनेता’ असे अलिखित सूत्र ठरले आहे. त्यानुसार  प्रत्येक वर्षी विरोधी पक्षनेत्याची निवड केली जाते. पक्षातील सर्वांना संधी मिळण्याच्या उद्देशाने व विरोधकांच्या विरोधात आव्हान उभे करण्यासाठी सक्षम विरोधी पक्षनेता देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आग्रह धरत आहे.

गेल्या साडेचार वर्षांच्या काळात योगेश बहल, नाना काटे, दिवंगत दत्ता साने यांच्यावर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी पक्षाने दिली होती. साने यांची कारकिर्द चांगलीच आक्रमक ठरली होती. सध्या सत्ताधारी भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी अनुभवी व ज्येष्ठ नगरसेवकांना विरुद्ध पक्ष नेतेपद देण्याची ची चर्चा सुरू आहे. त्यामध्ये नगरसेवक अजित गव्हाणे, माजी महापौर वैशाली घोडेकर, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर व मयुर कलाटे यांचे नाव समोर येत आहे. मात्र, विरोधी पक्षनेता निवडण्याचा सर्वोतोपरी निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातुन होणार आहे. यामध्ये गव्हाणे व कलाटे हे मराठा समाजाचे चेहरे आहेत. घोडेकर ओबीसी, तर शिलवंत धर हे अनुसुचित प्रवर्गातील चेहरा आहे.  विरोधी पक्षनेते पदासाठी एक स्थानिक व एक बाहेरचा असे समीकरण गेल्या साडेचार वर्षांमध्ये पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता ओबीसी चेहरा म्हणुन घोडेकर की अनुसूचित जातीप्रवर्गातून शिलवंत-धर यांना बाहेरचा म्हणून संधी मिळणार की पुन्हा स्थानिक गाववाल्यांचाच विचार होणार? यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

दरम्यान, महापालिका निवडणुका होईपर्यंत राजू मिसाळ यांना कायम ठेवावे, असाही काहीजणांचा सूर आहे. पण, भाजपा आमदार तथा शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्यासोबत झालेला ‘मैत्री डान्स’ नंतर मिसाळ यांच्याबाबत पक्षश्रेष्ठींमध्ये काहीशी नाराजी आहे, असेही सांगितले जाते.

कुणाचे बलस्थान काय?

अजित गव्हाणे :

नगरसेवक अजित गव्हाणे हे गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रबळ दावेदार मानले जात होते. पक्षाकडून त्यांना तिकीट देखील घेण्याबाबत विचारणा केली होती. मात्र माजी आमदार विलास लांडे यांची नाराजी नको म्हणुन ऐनवेळी त्यांनी निवडणुक लढविण्यास नापसंती दाखवली. मात्र, गव्हाणे यांनी भाजपा आमदार तथा शहराध्यक्ष महेश लांडगे यांचे बंधू सचिन लांडगे यांचा पराभव करीत २०१७ ची निवडणूक गाजवली आहे. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीचा चेहरा म्हणून गव्हाणे यांना विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागू शकते.

सुलक्षणा शिलवंत-धर :

पिंपरी विधानसभा मतदारसंघात सुलक्षणा शिलवंत- धर यांचे नाव कायम चर्चेत आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाकडून तिकीट ही देण्यात आले. मात्र, ऐनवेळी त्यांचे तिकीट कापले गेले. त्या ठिकाणी अण्णा बनसोडे यांच्या नावाला पक्षातील जेष्ठांनी पसंती दिली. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि युवा नेते पार्थ पवार यांच्या विश्वासातील नगरसेविका म्हणून त्यांनी शिलवंत-धर यांना ओळखले जाते. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीची गणित डोळ्यांसमोर ठेवून शिलवंत यांच्या नावाचाही विचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मयुर कलाटे :
चिंचवड विधानसभा मतदारसंघात आमदार लक्ष्मण जगताप यांचा एकहाती वरचष्मा आहे. अनेकांनी त्यांना काटेकी टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र ते पुरुन उरल्याचे दिसते.  पण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक मयुर कलाटे आणि शिवसेना गटनेते राहूल कलाटे दोघांनी जगताप यांना आव्हान दिले आहे. त्यामुळे आगामी चिंचवड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कलाटे यांच्या नावाचा विचार विरोधी पक्षनेतेपदासाठी होवू शकतो, असे बोलले जाते. तसेच, ‘‘दिल, दोस्ती, दुनियादारी’’ च्या माध्यमातून कलाटे यांनी आमदार जगताप यांच्यापुढे आव्हान उभे केले. त्याला पक्षाकडून ताकद मिळण्याची शक्यता आहे.

वैशाली घोडेकर :

माजी महापौर असणाऱ्या अनुभवी आणि सुशिक्षित नगरसेविका म्हणून वैशाली घोडेकर यांची ओळख आहे. राष्ट्रवादीकडून ओबीसी समाजातील नेतृत्त्वाला गेल्या साडेचार वर्षांमध्ये संधी मिळालेली नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये ओबीसी समाजाचे मतदान निर्णायक आहे. त्यामुळे घोडेकर यांना संधी देवून ओबीसी समाजाला जोडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जाईल, असेही राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button