TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

पिंपरी चिंचवड मनपा सेवकांच्या पतसंस्थेत “आपला महासंघ पॅनल” ला विजयी करण्याचा सभासदांचा निर्धार : अंबर चिंचवडे

पिंपरी : येत्या मंगळवारी ११ एप्रिल रोजी पिंपरी चिंचवड मानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित चे २०२३-२८ साठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत “आपला महासंघ” पॅनलच्या सर्व उमेदवारांना एकतर्फी निवडून देण्याचा निर्धार सर्व सभासदांनी केला आहे अशी माहिती पॅनल प्रमुख अंबर किसनराव चिंचवडे यांनी शनिवारी पिंपरीत पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी आपला महासंघ पॅनलचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना अंबर चिंचवडे यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड मनपा सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या सन २०२३-२८ या पंचवार्षिक कालावधीच्या निवडणुकीसाठी पतसंस्थेचे विद्यमान संचालक आणि पॅनलप्रमुख अंबर चिंचवडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व सभासदांच्या सहकार्याने “आपला महासंघ पॅनल” कपबशी निवडणूक चिन्ह घेवून ही निवडणूक जिंकणारच असा निर्धार करून लढत आहे. सध्या पतसंस्थेत अनागोंदी कारभार चालू आहे. सभासदांना तातडीच्या कर्जासाठी हेलपाटे मारावे लागतात. कर्जवाटप करताना पक्षपातीपणा, अपमानास्पद वागणूक, अरेरावीची भाषा आणि उद्धटपणा याला सामोरे जावे लागत आहे. सभासदांना चांगली वागणूक मिळत नाही.
संचालकाने स्वतः मागणी करूनही पतसंस्थेचे प्रोसिडिंग दाखविले जात नाही. मर्जीतील एकच ऑडीटर वेगवेगळ्या फर्मच्या नावाने वर्षानुवर्ष ऑडीटचे काम करत आहे. यामुळे खरे ऑडीट होते की, चोरी छुपे गैरकारभार सुरू आहे हे समजायला मार्ग नाही. यासाठी आम्ही रिऑडीटची मागणी केली तर ती मान्य केली जात नाही. पतसंस्थेमध्ये कर्मचारी भरती करताना नियमबाह्य पद्धतीने करण्यात आली असून स्वतःच्या नातेवाईकांनाच पात्रता नसताना व सहकार खात्याच्या अटी शर्तीचा भंग करून नियुक्ती तर दिली आहे. तसेच त्यांना पदोन्नती देऊन पतसंस्थेमध्ये व्यवस्थापक पदावर बसविले आहे. त्यामुळे गैरव्यवहार करण्याचा यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याने चुका करून पतसंस्थेचे नुकसान केले तरी त्याला पाठिशी घातले जात आहे. पतसंस्थेचे कार्यालय २ कोटी ६० लाखांना खरेदी करताना ९० टक्के पैसे दिले. उरलेले १० टक्के कम्प्लीशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर देणे योग्य असताना यांनी आधीच ते देऊन टाकले.
आता सगळ्यात गंभीर बाब म्हणजे कर्जमंजुरीसाठी अडवणूक करून पैशांची मागणी होऊ लागली आहे. तज्ज्ञ संचालकाला भेटा असा निरोप कर्जदाराला दिला जातो. हा तज्ञ संचालक नववी पास आहे. त्याने स्वतःची जाहिरात पतसंस्थेच्या पैशातून केली. आम्ही प्रकरण उघडकीस आणल्यावर घाईघाईने पैसे भरले, निर्वाचित संचालकांऐवजी तज्ञ संचालकच सगळा कारभार पाहतो. पतसंस्थेचा उपाध्यक्ष निरक्षर असून स्वतःच पतसंस्था उघडायला येतो. यांच्या नाकर्तेपणामुळे सुमारे ३ हजार कर्मचारी अद्यापही पतसंस्थेचे सभासद झालेले नाहीत. आज पतसंस्थेच्या विकासाची चाके एकाधिकारशाही, दादागिरी, झुंडशाही आणि भ्रष्ट कारभाराच्या दलदलीत रुतून बसली आहेत. चांगल्या कारभारासाठी सकारात्मक विचारांचे, लोकशाही मार्गाने सदैव पतसंस्थेच्या आणि सभासदांच्या प्रगतीचा विचार करणारे आणि उत्तम प्रशासकीय आणि आर्थिक सोयीसुविधा देण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांचे “आपला महासंघ पॅनल” बहुमताने निवडून देणे ही काळाची गरज सर्व सुज्ञ सभासदांनी ओळखली आहे. अंबर किसनराव चिंचवडे यांच्या नेतृत्वाखालील सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करून या पतसंस्थेत परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार सर्व सभासदांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button