breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेराजकारणसंपादकीय

कर्नाटकच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा पवित्रा बदलला; मावळात पार्थ अन्‌ शिरुरला डॉ. कोल्हेच उमेदवार!

आम आदमी पार्टीचा ‘मास्टर स्ट्रोक’ : मावळातून पार्थ पवार यांची उमेदवारी निश्चित?

पुणे । विशेष प्रतिनिधी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि घटकपक्षांच्या नेत्यांना ‘बुस्टर’ मिळाला असून, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित लढवण्याबाबत एकमत झाले आहे. देशातील सत्ताधारी भाजपाबाबत असलेले ‘अँटिइकंपन्सी’चा फायदा उठवण्याच्या तयारीत महाविकास आघाडीचे नेते असून, त्याला आम आदमी पार्टीची साथ मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कर्नाटकच्या निकालाची पुनरावृत्ती झाल्यास आप ‘किंग मेकर’च्या भूमिकेत राहील, असे चित्र आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी अर्थात ‘मातोश्री’वर आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भेट घेतली. लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधीला महत्व असते. यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करीत दिल्लीतील सत्ता संघर्षामध्ये केजरीवाल यांच्या बाजुने निकाल दिला. केजरीवाल यांनी केंद्र सरकारच्या हस्तेक्षेपाबाबत अद्यादेश काढला आहे. त्याला राज्यसभेत शिवसेनेने पाठिंबा द्यावा, असे आवाहन केजरीवाल यांनी केले. त्याला ठाकरे यांनी समर्थन दर्शवले आहे.

दरम्यान, ‘‘आगामी वर्ष हे निवडणुकीचे असून, आता गाडी सुटली तर देशात लोकशाही जिवंत राहणार नाही…’’ टीका उद्धव ठकारे यांनी करीत आपसोबत जुळवून घेण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. दिल्ली, पंजाब, गुजरात आणि गोवा राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये आपची कामगिरी उत्तम असून, भाजपाला रोखण्यासाठी आता महाराष्ट्रात ‘आप’ महाविकास आघाडीसोबत मैदानात उतरणार आहे.

भाजपाची सर्वाधिक ‘व्होट बँक’ शहरी भागात असून, या भागात भाजपाच्या मतांचे विभाजन व्हावे. याकरिता महाविकास आघाडी कामाला लागली आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये ग्रामीण भागात अपवाद वगळता भाजपाचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. त्यामुळे शहरी भागातील भाजपाची ‘व्होट बँक’ कमी करण्यासाठी महाविकास आघाडीने ‘आप’ला ताकद देण्याची भूमिका घेतली आहे.

‘आप’ची मुसंडी महाविकास आघाडीच्या पथ्थ्यावर…

आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या माध्यमातून दि. २८ मे २०२३ पासून पंढरपूर ते रायगड अशी ‘‘स्वराज्य यात्रा’’ काढण्यात येणार आहे. ही यात्रा शहरी भागातून जाणार आहे. त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे. तसेच, ‘स्वराज्य’ आणि भगवा अशी थीम निश्चित केली असून, भाजपाच्या हिंदूत्वाच्या मुद्याला ‘डॅमेज’ करण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न आहे. कारण, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचे श्रद्धास्थान श्री विठोबा यांच्या नावाचा उल्लेख करीत ‘आप’ ने नागरिकांना भावनिक साद घातली आहे. यासह भ्रष्टाचार आणि धार्मित ध्रुवीकरण असे मुद्दे आप उचलून धरणार आहे. त्यामुळे ‘आप’ची महाराष्ट्रातील मुसंडी महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडणार आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकार नोंदवतात.

डॉ. अमोल कोल्हे यांची तलवार म्यान…

शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीपासून दुरावले आहेत, अशी चर्चा होती. डॉ. कोल्हे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतील, असा दावाही केला जात होता. मात्र, कनार्टक निवडणुकीच्या निकालानंतर डॉ. कोल्हे यांनी आपला पवित्रा बदलला. त्यातच शिरुर लोकसभा मतदार संघातून माजी खासदार शिवाजीराव आढळराव शिंदे गटाच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवारीवर दावा करणार आहेत. त्यांना डावलले तर आढळराव बंडखोरी करीतील आणि भाजपाकडून उमेदवारी मिळूनसुद्धा मतविभाजनामुळे पराभवाचा सामना करावा लागेल. याचा अंदाज आल्याने डॉ. कोल्हे यांनी ‘तलवार म्यान’ केल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

पार्थ पवार यांना मावळातून पुन्हा संधी…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मातब्बर नेते आणि विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना २०१९ मध्ये मावळ मतदार संघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले होते. मात्र, या निवडणुकीत शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा विजय झाला. हा पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला आहे. बारणे यांनी आता शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून पार्थ पवार पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उरतील. कारण, मावळ लोकसभा मतदार संघात पिंपरी, मावळ आणि चिंचवड मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद तुल्यबळ आहे. तसेच, घाटाखालील उरण, पनवेल आणि कर्जत मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाला मानणारा मतदार मोठ्या संख्येने आहे. भाजपातील अंतर्गत बंडाळीचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होईल, असा कयास असल्याने मावळातून पुन्हा एकदा पार्थ पवार यांना संधी देण्याबाबत पक्षश्रेष्ठींचे खलबत सुरू आहेत, अशी चर्चा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button