वाई नगराध्यक्षांच्या अपात्रतेचा निर्णय
![Y Disqualification decision of the mayor](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/mantralay-1.jpg)
वाई |
वाई पालिकेच्या नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांना राज्य शासनाने लाच प्रकरणी पदच्युत केले आहे. ठेकेदाराकडून लाच घेतल्याचा आरोप त्यांच्याविरुद्ध होता. याबाबत नगरविकास मंत्रालयात झालेल्या सुनावणीनंतर शासनाने बुधवारी हा निर्णय दिला. डॉ. शिंदे यांच्याविरुद्ध ९ जून २०१७ रोजी एका झालेल्या कामाची देय रक्कम देणे तसेच पुढील देयक काढण्यासाठी संबंधित ठेकेदाराकडून १४ हजार रुपयांची लाच घेतानाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्या दोघांना लाचलुचपत विभागाने अटक केली होती. त्यांच्या अटकेनंतर त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात जामीन घेतला होता. दरम्यान काळात पालिकेतील उपनगराध्यक्ष अनिल सावंत व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत तीर्थक्षेत्र आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी त्यांना पदावरुन बाजूला करा, अशी मागणी राज्य शासनाकडे केली होती. त्यावर दोन वेळा राज्यशासनाच्या नगरविकास मंत्रालयात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर शासनाकडून कोणताही निर्णय न झाल्यामुळे उपनगराध्यक्ष अनिल सावंत व त्यांच्या गटाच्या नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
न्यायालयात झालेल्या सुनावणीत याप्रकरणी पुढील आठ दिवसात निर्णय दिला जाईल असे शासनाने सांगितले. यानुसार बुधवारा शासनाने डॉ. शिंदे यांना नगराध्यक्षपदावरुन हटविण्याचा निर्णय दिला व उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी पदभार घेण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला. त्याप्रमाणे आज तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष संजय लोळे व सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत अनिल सावंत यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. नगराध्यक्ष प्रतिभा शिंदे या थेट जनतेतून निवडून आलेल्या आहेत. वाई नगरपालिकेमध्ये एकूण वीस नगरसेवकांपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चौदा तर काँग्रेस-भाजपा प्रणीत महाविकास आघाडीचे सहा नगरसेवक आहेत.
वकिलांशी बोलून पुढील निर्णय – शिंदे
दरम्यान हा निर्णय अनपेक्षित आहे. याबद्दल मला कोणालाही दोष द्यायचा नाही. मी वकिलांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे नगराध्यक्ष डॉ. प्रतिभा शिंदे यांनी सांगितले.