WPL 2026 बिगुल वाजलं! पहिल्याच सामन्यात मुंबई आणि आरसीबी आमनेसामने; फ्रीमध्ये कुठे पाहता येणार? जाणून घ्या

WPL 2026 kicks off with MI vs RCB match : क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. ‘वूमेंस प्रीमियर लीग’च्या चौथ्या हंगामाचा दिमाखदार सोहळा ९ जानेवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या हंगामातील पहिलाच सामना गतविजेत्या आणि दिग्गज संघामध्ये रंगणार असून, क्रिकेट प्रेमींना पुन्हा एकदा महिला क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळणार आहे.
वूमेंस प्रीमियर लीगचा सलामीचा सामना हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आणि स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईतील डी. वाय. पाटील क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यापूर्वी भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे. यानंतर ७:०० वाजता सामन्याची नाणेफेक होईल आणि त्यानंतर संध्याकाळी ७:३० वाजता सामना सुरू होईल.
हेही वाचा – राज्यातील २९ महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर
डब्ल्यूपीएल २०२६ चे थेट प्रक्षेपण टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना ‘जिओ हॉटस्टार’ या ॲपवर सामन्यांची लाईव्ह स्ट्रीमिंग विनामूल्य पाहता येईल. चाहत्यांना फक्त डेटा खर्च करावा लागेल, यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.
आतापर्यंत झालेल्या तीन हंगामांमध्ये मुंबई इंडियन्सने आपले वर्चस्व राखले आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने २ वेळा विजेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने एकदाच ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. दुर्दैवाने दिल्ली कॅपिटल्सचाच्या संघाला तीनही वेळा फायनलमध्ये पोहोचूनही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.





