बेळगाव पालिकेवर मराठी झेंडा फडकणार? आज मतमोजणी
![Will Marathi flag fly over Belgaum Municipality? Counting today](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/Belgaon-election.jpeg)
बेळगाव – तब्बल ३ वर्षांहून अधिक काळ बरखास्त राहिलेल्या बेळगाव महापालिकेची निवडणूक प्रक्रिया अखेर ८ वर्षांनंतर यंदा पार पडली. काही वैशिष्ट्यपूर्ण बदलांनी झालेल्या या निवडणुकीसाठी ५०.४१ टक्के लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून या बेळगाव महापालिकेवर आपलाच झेंडा फडकविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती रिंगणात उतरली आहे. बेळगाव महापालिकेचा गड कायम राखण्यासाठी मराठी भाषिक एकवटल्याचे चित्र पुन्हा एकदा दिसून आले आहे. यामुळे बेळगावमध्ये कोण बाजी मारते याबाबत उत्सुकता आहे. आज, सोमवार ६ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
यंदाच्या बेळगाव महापालिका निवडणूकीचे वैशिष्ट्य असे की, पालिकेच्या इतिहासात प्रथमच काँग्रेस, भाजपासारखे राष्ट्रीय पक्ष आपल्या चिन्हांवर लढत आहेत. तसेच यावेळी पहिल्यांदाच मतदानासाठी ईव्हीएम मशीन वापरण्यात आले होते. ५८ जागांसाठी ३८५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडून २३ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. सर्वांत जास्त म्हणजे ५५ उमेदवार भाजपाने उभे केले आहेत. सव्वा चार लाख मतदार संख्या असलेल्या या पालिकेची आधीची निवडणूक २०१३ साली झाली होती. यंदा मराठी भाषिकांनी मतदानाला जाताना आपल्या घरांवर भगवे झेंडे फडकावले होते. यावेळी त्यांनी बेळगाव, कारवार, निपाणी, भिदरसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्याच्या चळवळीचे केंद्रस्थान असलेल्या बेळगाव पालिका निवडणूकीच्या आज लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.