यूपीएचं अध्यक्षपद स्वीकारणार का; शरद पवारांची भूमिका
![Will he accept the presidency of UPA; The role of Sharad Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Will-he-accept-the-presidency-of-UPA-The-role-of-Sharad-Pawar.jpg)
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आगामी काळात देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका पार पाडणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर स्वत: पवार यांनीच याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ‘यूपीएचं अध्यक्षपद स्वीकारण्यात मला रस नाही. मात्र विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी जे सहकार्य लागेल ते माझ्याकडून केलं जाईल,’ असं शरद पवार यांनी कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नेत्यांकडून काही दिवसांपूर्वी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यूपीएचं अध्यक्षपद स्वीकारावं, असा ठराव करण्यात आला होता. या ठरावानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही शरद पवार हे विरोधी पक्षांचे मजबूत आधारस्तंभ असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे शरद पवार हे यूपीएचे अध्यक्ष होणार का, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र आता पवार यांनी स्वत:च खुलासा केला असून अशी जबाबदारी स्वीकारण्यास आपण इच्छुक नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच ज्या पक्षाचा विस्तार देशभर आहे त्या पक्षाने या कामासाठी पुढे यावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल
शरद पवार यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर आणि महागाईसह इतर मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ‘लोकशाही मजबूत करायची असेल तर विरोधी पक्ष सक्षम असायला हवा. नाहीतर पुतीन यांच्यासारखं होऊन बसेल. सत्तेचा गैरवापर करावा, या संस्कारात आम्ही वाढलो नाही. त्यामुळे तपास यंत्रणांचा वापर आम्ही कधी केला नाही. ईडी हा शब्द कुणाला माहीत होता का? मात्र सध्या ईडीचे लोक आज याच्या घरी, उद्या त्याच्या घरी जातात,’ अशा शब्दांत पवार यांनी सरकारवर निशाणा साधला.
दरम्यान, ‘पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती रोज वाढतात, हे आपण कधी पाहिलं नव्हतं. भाजपचे राज्य आल्यानंतर भरमसाठ किंमती वाढत आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या सगळ्याची किंमत सर्वसामान्य नागरिकांना सोसावी लागते. मात्र या मुद्द्यावर केंद्र सरकार बोलत नाही. एकेकाळी भाजपचे नेते कांद्याच्या माळा घालून आले होते,’ असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.