कल्याणमध्ये विधवा महिलेची भिंतीवर डोकं आपटून हत्या; आरोपी इतरांचे फोन वापरत देत होता चकवा, पण अखेर पोलिसांनी गाठलं
![Widow killed in Kalyan; Chakwa was using other people's phones, but was eventually apprehended by the police](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Kalyan-Murder.jpg)
कल्याण |
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा भागात राहणाऱ्या एका सहसोबती विधवा महिलेची प्रियकराने घरात घुसून भिंतीवर डोके आपटून, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत हत्या केली होती. या घटनेनंतर प्रियकर फरार झाला होता. विठ्ठलवाडी पोलिसांनी मोबाइल संपर्कातून प्रियकराचा माग काढून त्याला शनिवारी इगतपुरी येथून अटक केली. ही घटना कल्याण पूर्वेतील चिंचपाडा भागातील एका चाळीत घडली होती. मयत महिलेच्या मुलीच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. अनिल भातसोडे (25, राहणार चिंचपाडा) असे अटक करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. सुकन्या (44) मयत महिलेचे नाव आहे.
सुकन्या आपली १७ वर्षाच्या मुलीसोबत चिंचपाडा गावात राहात होती. तिच्या पतीचे सात वर्षांपूर्वी निधन झाले होते. कुटुंब गाडा चालवण्यासाठी दोघी माय लेकी भोजन रांध्याचा व्यवसाय करत होत्या. यादरम्यान आरोपी अनिलशी मयत विधवा महिलेची ओळख झाली. दोघांनी सहसोबती म्हणून राहण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपासून दोघांमध्ये लग्नावरून वाद सुरु होता. त्यानंतर अनिल दारू पिऊ लागला. या वादामुळे मयत सुकन्या अनिलला भेटण्यास गेल्या तीन महिन्यांपासून टाळाटाळ करत होती. दोघेही वेगळे राहत होते. तरीही तो सुकन्याला बाहेर भेटायला बोलावयाचा, तिच्याकडे पैशांची मागणी करत होता. गेल्या आठवड्यात रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मुलगी घराबाहेर उभ्या केलेल्या रिक्षात मोबाइल बघत होती. मुलीला आई ओरडण्याचा व भांडे पडल्याचा आवाज आला. तिने खिडकीतून डोकावलं असता आरोपी अनिल भातसोडे हा आई सुकन्या हिला लाथाबुक्कीने मारत तिचे डोके भिंतीला आपटत होता. मारहाणीत सुकन्या गंभीर जखमी झाली. रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मुत्यू झाला. मारहाणीनंतर आरोपी अनिल पळून गेला.
अनिल मूळचा जालना जिल्ह्यातील रहिवाशी असल्याचे पोलिसांना समजले. अनिलकडे मोबाइल नसल्याने तो विविध रेल्वे स्थानकावर प्रवाशांना माझा मोबाईल फोन चोरीला गेला आहे, असे सांगून त्यांच्या फोवरून भावाला फोन करत होता. पोलीस त्याच्या भावाच्या संपर्कात होते. पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहायक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांच्या निर्देशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध विभागाची दोन पथके तयार करुन शोध सुरू केला होता. आरोपी अनिलने एका प्रवाशाच्या फोनवरून त्याच्या भावाशी संपर्क साधला. अनिल लोकलमध्ये असल्याचे ठिकाण मिळताच उपनिरीक्षक हर्षल राजपूत, हवालदार रामदास मिसाळ, समीर गायकवाड यांनी इगतपुरी रेल्वे स्थानकातून आरोपीला शनिवारी अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली.