राहुलने दर्शना पवारची हत्या का केली? पुणे पोलिसांचा मोठा खुलासा

पुणे : एमपीएससी उत्तीर्ण दर्शना पवार हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी मुख्य आरोपी राहुल हंडोरेला मुंबईमधुन अटक केली आहे. पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाबाबत मोठा खुलासा केला आहे. यात त्यांनी राहुल हंडोरेने दर्शना पवारची हत्या का केली याचं कारणंही सांगितलं आहे.
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शना पवारने राहुल हंडोरेला लग्नासाठी नकार दिला. त्यामुळे त्याने दर्शनाचा खून केला. दोघांचीही खूप जुनी ओळख आहे. आरोपी राहुलला दर्शनासोबत लग्न करायचं होतं. मात्र दर्शनाने या लग्नाला नकार दिला म्हणून राहुलने खून केल्याची प्राथमिक माहिती आहे.
हेही वाचा – संजय राऊतांकडून शिंदे-फडणवीस सरकारमधील नेत्यांच्या घोटाळ्यांची यादी जाहीर
आरोपी राहुल हा देखील एमपीएससीची तयारी करत होता. तो अर्धवेळ नोकरी करून स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा. त्याने वेगवेगळ्या परीक्षाही दिल्या आहेत. सध्या तो वेगवेगळ्या फूड डिलिव्हरी सर्व्हिसेसमध्ये काम करत होता आणि एका रूममध्ये रहात होता. दोघांची ओळख लहानपणापासून होती. दर्शनाच्या मामाचं घर आणि आरोपी राहुल हंडोरेचं घर समोरासमोर होतं. त्यामुळे दोघांची लहानपणापासून ओळख होती. दोघांचं प्रेमप्रकरण होतं की नाही हे सखोल चौकशीनंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती पुणे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली आहे.





