झाडांमुळे अपघात झाल्यास जबाबदारी कोण घेणार?
![Who will take responsibility in case of an accident due to trees?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/middle-tree-4-scaled.jpg)
- उद्योजक संघटनेचा कथित गांधीवाद्यांना सवाल
वर्धा |
रस्त्याच्या मध्ये येणाऱ्या झाडांमुळे अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कथित गांधीवादी घेणार काय, असा सवाल उद्योजक संघटनेने करीत निर्थक विरोध केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. वर्धा ते सेवाग्राम तसेच वर्धा ते दत्तपूरपर्यत चारपदरी सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. रस्ता बांधकामादरम्यान मोठे वृक्ष तोडू नये म्हणून ठरलेल्या रस्त्याची रुंदी कमी करण्यात आली. तरीही रस्त्याच्या मधोमध काही झाडे आली आहे. ही झाडे वाचविण्यासाठी यापेक्षा रस्ता अधिक रूंद करणे शक्य नसल्याचे बांधकाम विभागाने स्पष्ट केले होते. मात्र तरीही ही झाडे मधोमध आली असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. परंतु ही झाडे तोडण्यास काही गांधीवादी संघटना स्पष्ट विरोध करीत आहे. त्यासंदर्भात अनेक बैठका झाल्या.
प्रशासन व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी यातील काही झाडे कापणे आवश्यक असल्याचे समजावून सांगितले. त्याची भरपाई म्हणून रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळय़ा जागेवर झाडे लावण्याची हमी देण्यात आली. एवढेच नव्हे तर सहा फु ट उंचीचे दहा हजार झाडे लावणे व त्याची देखभाल करण्याच्या कामाची निविदाही निघाली. लगेच झाडे लावण्याची कामेही सुरू झाली असल्याचे एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण हिवरे यांनी निदर्शनास आणले. त्यामुळे नाहक विरोध कशाला, या रस्त्यावरून सेवाग्राम रुग्णालय तसेच एमआयडीसी परिसरात असंख्य वाहनांची ये-जा सुरू असते. झाडे मधोमध राहिल्यास रात्रीच्या वेळेस रुग्णवाहिका तसेच आवश्यक वाहनांचा खोळंबा होऊ शकतो. म्हणून विरोध सोडावा, असे आवाहन त्यांनी केले.
ही झाडे ऐतिहासिक असल्याचे तसेच गांधी वास्तव्य काळात लावण्यात आल्या असल्याचा दाखला वृक्षप्रेमी देतात. मात्र हे धादांत खोटेअसल्याचा युक्तिवाद केला जातो. ही झाडे पन्नास वर्षांच्या आतील असल्याचा अहवाल पर्यावरण समितीने नुकताच दिल्याचे सांगितल्या जाते. बापुराव देशमुख फोउंडेशनच्या पुढाकाराने निसर्ग सेवा समितीचे प्रमुख मुरलीधर बेलखोडे यांनी ही झाडे बापुरावजी व प्रमोद शेंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लावली. त्याची संपूर्ण देखभाल करून जगविली. त्यामुळे ऐतिहासिक झाडे असल्याचा मुद्दा निकालात निघतो. रस्ता ही या परिसरातील आज मुख्य गरज ठरला आहे. वाहतूक सुरळीत व निर्धोक होऊ देण्याची बाब महत्वाची आहे. झाडे तोडण्यास विरोध करणाऱ्यांनी झाड की मनुष्याचा जीव महत्वाचा हे स्पष्ट करावे. नाहक विरोध राहिल्यास झाडे तोडण्यासाठी आंदोलन केल्या जाईल, असाही इशारा उद्योजक देतात.