बहुतांश धरणे तुडुंब असताना पावसाचे झोडपणे सुरू राहिल्याने गंगापूरसह १४ धरणांमधून विसर्ग करावा लागला
![While most of the dams were overflowing, 14 dams including Gangapur had to be released due to heavy rains](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/nashik-rain.jpg)
नाशिक : गणरायाचे आगमन झाल्यानंतर मध्यरात्रीपासून शहर व ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटात सुरू असलेल्या तुफान पावसाने अक्षरश: कहर केला आहे. अवघ्या काही तासांत विक्रमी पाऊस होत असल्याने शहर पुन्हा जलमय झाले. रात्रीनंतर गुरुवारी सायंकाळी त्याने पुन्हा शहराला झोडपून काढले. अनेक रस्ते, चौकांना नदीसारखे स्वरूप आले. ग्रामीण भागही त्यास अपवाद नाही. अनेक भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. बहुतांश धरणे तुडुंब असताना पावसाचे झोडपणे सुरू राहिल्याने गंगापूरसह १४ धरणांमधून विसर्ग करावा लागला. यामुळे गोदावरीसह अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
गणेशोत्सवाच्या धामधुमीत जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाचा सार्वजनिक गणेश मंडळांनी धसका घेतला आहे. बुधवारी रात्री ११ च्या सुमारास विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. अवघ्या साडेतीन तासांत म्हणजे रात्री अडीचपर्यंत ५५.६ मिलिमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली. तर रात्री अडीच ते पहाटे साडेपाच वाजेपर्यंत ११.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गुरुवारी वातावरण ढगाळ असले तरी सकाळी सूर्यदर्शन घडले; परंतु ऊन-तुफान पावसाचा लपंडाव कायम राहिला. सायंकाळी ५ वाजता विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस सुरू झाला. तासाभरात बहुतांश रस्ते व सखल भागातून पाण्याचे पाट वाहू लागले. वाहनधारकांना दिवे लावूनही काही फुटांच्या अंतरावरील दिसत नव्हते. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागले. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली. यंदाच्या हंगामात कमी वेळात अधिक पावसाचे नवनवे विक्रम प्रस्थापित होत आहे. पावसाने लहानमोठय़ा विक्रेत्यांसह नागरिकांची धावपळ उडवून दिली. अनेक भागांत वारंवार वीजपुरवठा खंडित झाला. शहराप्रमाणे ग्रामीण भागास पावसाने झोडपले. मागील २४ तासांत इगतपुरीत १०१.५, सिन्नरमध्ये ८०, तर नाशिक शहरात ६७.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात सरासरी ५५.३ मिलिमीटर पाऊस झाल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. आधीपासून तुडुंब भरलेल्या धरणांमध्ये जलसंचयास जागा नाही. त्यामुळे पावसाची तीव्रता लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाला विसर्ग करावा लागत आहे.