‘काम झालं की विषय संपला, त्यांना जाणीव नाही’; चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांना डिवचले
!['When the work is done, the subject is over, they are not aware'; Chandrakant Patil defeated Satej Patil](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/When-the-work.jpg)
कोल्हापूर | जाणीव नसणाऱ्यांची जी मोठी यादी आहे त्यामध्ये पालक मंत्री सतेज पाटील हे टॉपवर आहेत असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी कोल्हापुरात केला. काम झालं की विषय संपला अशी त्यांची वृत्ती असल्याचेही ते म्हणाले. प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, २००४ साली सतेज पाटील हे विधानसभेला विजयी व्हावेत म्हणून सासने मैदान येथे आम्ही सभा घेतली होती. त्या सभेसाठी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना आणले होते. यामुळे पाटील विजयी झाले, पण नंतर त्यांनी त्याची जाणीव ठेवली नाही. जाणीव न ठेवणाऱ्यांच्या यादीत त्यांचे नाव टॉपवर आहे.
पाटील म्हणाले, धनंजय महाडिक यांच्या विधानाचा विपर्यास्त करून दोन दिवस चुकीचा मेसेज पाठवला जात आहे, मुळात महाडिक यांच्या भाषणाची मोडतोड करून असा मेसेज पाठवला जात असल्यामुळे याबाबत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. भाजप हा महिलांचा आदर करणारा पक्ष आहे, त्यामुळे आमच्याकडून असा कोणताही अनादर होणार नाही. धनंजय महाडिक यांच्या नावाने टाहो फोडणे पेक्षा करुणा मुंडे यांना न्याय द्या, अनेक वर्षे ते न्याय मागत आहेत, न्याय मागण्यासाठी त्यांना कोल्हापुरात यावे लागले आहे असा टोला की पाटील यांनी मारला.
कोल्हापुरात काही कॉलेजचे विद्यार्थी घरोघरी जाऊन माहिती भरून घेत आहेत, माहिती भरून आणल्यानंतर मार्क वाढवू असे आमिष दाखवले जात आहे, हे विद्यार्थी कोण आहेत, ते घरोघरी का फिरत आहेत याबाबत तक्रार करणार असल्याची माहिती देऊन पाटील म्हणाले, काही ठिकाणी मतदारांना ऑनलाईन पैसे देण्याचा प्रयत्न सुरु आहे, तो आम्ही हाणून पाडू असा इशाराही त्यांनी दिला.
‘राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वार्थी पक्ष’
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वार्थी पक्ष असून तो सत्तेसाठी कोणालाही सोबत घ्यायला तयार असतो. हे लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस हा भूमिका बदलणारा आणि दगा देणारा पक्ष आहे, असा टोलाही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा रिमोट असल्याची टीकाही त्यांनी केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना आपण गृहखाते तुमच्याकडे ठेवा अशी विनंती केली होती. जर गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेसला दिले गेले, तर राष्ट्रवादीचे नेते मातोश्रीवर कॅमेरे लावतील, असे आपण मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपला हा सल्ला मानला नाही, असे सांगतानाच आता सल्ला देण्याची वेळ निघून गेली असल्याचेही ते म्हणाले.