“दिल्लीची हुजरेगिरी करून महाराष्ट्राची बदनामी करणारे हे मंत्री काय कामाचे?”
!["What is the use of this minister who is defaming Maharashtra by harassing Delhi?"](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/EzKzEUHVIAEub2L.jpg)
मुंबई |
काही आठवड्यांपूर्वी लस पुरवठ्यावरून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार आमने-सामने आल्याचं बघायला मिळालं होतं. त्यानंतर रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून केंद्र-राज्य संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आल्याचं दिसत आहे. राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केल्यानंतर आता काँग्रेसनंही या वादात उडी घेत महाराष्ट्रातील भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. राज्यात प्रचंड वेगानं रुग्णवाढ होत असून, आरोग्य सेवांवर भार पडू लागला आहे. अचानक झालेल्या रुग्णसंख्येच्या विस्फोटाने बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे. महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा पुरवठा करू नये म्हणून केंद्राने साठा असलेल्या कंपन्यांवर दबाव आणल्याचा आरोप राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केला. त्याला उत्तर देताना भ्रष्ट आणि स्वार्थी महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रातील जनता सारे भोगत असल्याची टीका रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केली होती.
ऑक्सीजन तुटवड्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क केला असता 'ते बंगालच्या प्रचारात व्यस्त आहेत' असं उत्तर देण्यात येतं, रेमडेसिवीर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना पुरवठा करू नका सांगितलं जातं.
दिल्लीची हुजरेगिरी करून महाराष्ट्राची बदनामी करणारे हे मंत्री आपल्या काय कामाचे? pic.twitter.com/F3y1bqRi1d— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 17, 2021
या राजकीय संघर्षात आता काँग्रेसनंही उडी घेतली असून, महाराष्ट्रातील भाजपा आणि एनडीएतील मित्रपक्षाच्या खासदारांवर निशाणा साधला आहे. “ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क केला असता ‘ते बंगालच्या प्रचारात व्यस्त आहेत’ असं उत्तर देण्यात येतं. रेमडेसिवीर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना पुरवठा करू नका सांगितलं जातं. दिल्लीची हुजरेगिरी करून महाराष्ट्राची बदनामी करणारे हे मंत्री आपल्या काय कामाचे?,” असा सवाल करत टीकास्त्र डागलं आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, रेल्वे मंत्री पीयूष गोयल, माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आणि संजय धोत्रे यांच्यावर महाराष्ट्राची बदनामी करत असल्याचा आरोप करत टीका केली आहे. एक फोटो ट्विट केला असून, त्यावर “दिल्लीची हुजरेगिरी करून मातृभूमीची बदनामी करणारे हे केंद्र सरकारमधील महाराष्ट्रद्रोही मंत्री महाराष्ट्राच्या काय कामाचे?,” असंही काँग्रेसनं म्हटलं आहे.
वाचा- #Covid-19: पूर्ण क्षमतेने लसनिर्मिती करा: पंतप्रधान नरेंद्र मोदी