#War Against Corona : शिवभोजन योजना आता तालुकास्तरावर; पुढील ३ महिने पाच रुपये दरात भोजन मिळणार!
![Free Shivbhojan will be closed; From October 1, Rs 10 per plate again](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Cabinet-approval-for-the-Shivbhojan-scheme-1-1280x720-1.jpg)
मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी
शिवभोजन योजनेचा तालुका स्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने पाच रुपये इतक्या दरात शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मजुर, स्थलांतरीत, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी व इतर लोक यांचे जेवणाअभावी हाल होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
सध्या जिल्हा मुख्यालयी ही शिवभोजन केंद्रे चालविली जातात. आता तालुका स्तरावर सुरु होतील. पुढील तीन महिन्यासाठी शिवभोजनाच्या प्रती थाळीचा दर पाच रुपये इतका करण्यात आला आहे.
शिवभोजन थाळीची किंमत शहरी भागात ५० रुपये प्रती थाळी असून ग्रामीण भागात ३५ रुपये इतकी आहे. प्रत्येक ग्राहकाकडून मिळालेल्या पाच रुपये एवढ्या रकमेव्यतिरिक्त उर्वरित रक्कम शहरी भागात प्रती थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागात प्रती थाळी ३० रुपये असे अनुदान संबंधित केंद्र चालकाला देण्यात येईल.
ही भोजनालये सकाळी ११ ते दुपारी ०३ या काळात सुरु राहतील. या शिवभोजन केंद्र चालकांना देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ठेवणे, निर्जंतुकीकरण करून घेणे, कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे तसेच मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.