भावनिक न होता देशाच्या भवितव्यासाठी महायुतीला मतदान करा; माजी सैनिकांच्या मेळाव्यात अजित पवारांचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आठरापगड जाती-धर्मांचे नेतृत्व : अजित पवार
![Vote for the Grand Alliance for the future of the country without being sentimental; Ajit Pawar's appeal at the gathering of ex-servicemen](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/SUNTRA-AJIT-PAWAR-780x470.jpg)
पुणे : बारामती लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार मैदानात उतरले आहेत. आज माजी सैनिकांच्या मेळाव्यात भावनिक न होता देशाच्या भवितव्यासाठी महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, मित्रांनो प्रत्येकाचा एक काळ असतो तुमच्या काळात तुम्ही आजी सैनिक म्हणून काम केलं आता तुम्ही माजी सैनिक झाले आहात. आता तुम्ही रिटायरमेंटचं आयुष्य जगत आहात, लक्षात घ्या ही भावकीची किंवा गावकीची निवडणूक नाही तर देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे त्यामुळे भावनिक होऊ नका, 140 कोटी जनतेचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे, आपल्या नातवंडाचं पत्वंडाचं भवितव्य कोण चांगल्या प्रकारे घडवू शकेल याचा विचार करा. हा विचार केल्यानंतर तुम्ही हाही विचार करा जेव्हा तुम्ही सैन्यामध्ये होता तेव्हा तुमचा लीडर खमक्या असेल तर तुम्ही त्याच्या नेतृत्वाखाली काम करता त्याचप्रमाणे आपल्या देशाचा 140 कोटी जनतेचे नेतृत्व करणारा नेता देखील मजबूत असला पाहिजे आज आम्ही ज्यांच्या पाठीशी उभे आहोत किंवा ज्यांचे समर्थन करतो ते आहेत नरेंद्र मोदी जागतिक पातळीवर आज सर्वात लोकप्रिय नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं परदेशात देखील भारताचं नावलौकिक वाढवण्याचे काम या नेत्याने केलेला आहे.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, आपल्या देशाची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे. आता आपली अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे. देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर गेल्यावर त्याचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट परिणाम आपल्या देशावर दिसणार आहे, मतदान करताना या सगळ्यांचा विचार करायला पाहिजे.
विरोधी पक्षांनी आज एक तरी असा पंतप्रधान पदाचा नेता दाखवावा जो अठरापगड जाती, धर्म यांचे नेतृत्व करू शकेल. ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सर्वांना एकत्र ठेवते त्याप्रमाणे देश एकत्र ठेवणारा नेता त्यांच्याकडे आहे का? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. अनेकदा विरोधी पक्षावर कडून आमच्यावर टीका केली जाते की ही निवडून आले की घटना बदलतील देशात निवडणुका होणार नाहीत, देशात हुकूमशाही येईल मात्र हे खोटे आहे, विरोधकांकडे प्रचारासाठी मुद्दा नसल्याने विरोधक घटना बदल किंवा संविधान बदल हा मुद्दा घेऊन प्रचार करत आहेत.
दरम्यान, बारामतीत झालेला विकास हा विकास नाही असं कोणी म्हणू शकेल का? इथून पुढच्या काळात आम्हाला बारामती बरोबरच इंदापूर, दौंड, राजगड, खडकवासला , पुरंदर, हवेली आदी भागांचा देखील विकास करायचा आहे आणि करण्याची ताकद फक्त आज अजित पवार मध्ये आहे, असेही त्यांनी सांगितले.