वाईच्या सुपुत्राला लडाखमध्ये वीरमरण
सातारा – वाई तालुक्यातील आसले गावचे सुपुत्र सोमनाथ मांढरे यांना लडाख येथे देशसेवा बजावताना वीरमरण आले. देश सेवा करत असताना अतिशय प्रतिकूल वातावरणाचा सामना करत असताना त्यांना हे वीरमरण आले. लडाख येथे त्यांची नेमणूक करण्यात आली होती. यावेळी हवामानातील बदलामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यातच ते बेशुद्ध झाले. त्यांना जवळच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि आठ वर्षाचा मुलगा व फक्त दहा महिन्याची मुलगी व लहान भाऊ असा परिवार आहे.
दरम्यान, सोमनाथ मांढरे यांना वीरमरण आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याबाबात वाईचे तहसीलदार रणजीत भोसले यांना सर्वप्रथम कळविण्यात आले होते. त्यानंतर आसले (ता. वाई) येथील सोमनाथ मांढरे यांचे बंधू महेश मांढरे यांना याची माहिती देण्यात आली.