मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते ‘महाराष्ट्र केसरी’च्या लोगोचे अनावरण
![Unveiling of the logo of 'Maharashtra Kesari' by Chief Minister-Deputy Chief Minister](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/Maharashtra-Kesari-780x470.jpg)
पुणे : महाराष्ट्रातील प्रतिष्ठित अशा ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचा थरार येत्या १० जानेवारीपासून पुण्यातील कोथरूडमध्ये रंगणार आहे. या ‘महाराष्ट्र केसरी’च्या लोगोचे अनावरण आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते तर विरोधी पक्षनेते अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाले.
म्हाळुंगे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या कार्यक्रमावेळी ‘महाराष्ट्र केसरी’चे प्रमुख संयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार भीमराव तापकीर, आ. सुनील कांबळे, भाजपा शहराध्यक्ष जगदीळ मुळीक, चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. हनुमंत गावडे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष पै. योगेश दोडके, अहमदनगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे, दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते पै. विलास कथुरे, पै. मेघराज कटके, पै. नवनाथ घुले, पै. गणेश दांगट, पै. माऊली मांगडे, पै. कृष्णा बुचडे, पै. संतोष माचुत्रे आदी उपस्थित होते.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, “स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘महाराष्ट्र केसरी’चे आयोजन यंदा मोहोळ कुटुंबीयांकडे आहे. स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी, कोथरूड येथे स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात असून, आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, क्रीडामंत्री व विरोधी पक्षनेते यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झाले, याचा आनंद होत आहे.”