जालना-जळगाव मार्गास केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचा हिरवा कंदील; राज्यमंत्री दानवे यांचा आग्रह
![जालना-जळगाव मार्गास केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचा हिरवा कंदील; राज्यमंत्री दानवे यांचा आग्रह](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/railway-track.jpg)
जालना |
जालना ते जळगाव दरम्यानच्या १७४ किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वे मार्गासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आग्रही आहेत. या मार्गाच्या संदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आल्यावरच दानवे यांनी यासंदर्भात सर्वेक्षण होणार असल्याचे जाहीर केले. शनिवारी मुदखेड- मनमाड रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरण कामाच्या शुभारंभ कार्यक्रमात दानवे यांनी जालना-जळगाव मार्गाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले,की केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी हा नवीन मार्ग टाकण्याच्या संदर्भात चर्चा केली. त्यांनी आवश्यक नकाशे वगैरे पाहिले. आणि ‘गो अहेड’ असे म्हटल्यानंतर या मार्गाच्या संदर्भात आपण बोललो. १७४ किलोमीटर लांबीच्या या रेल्वेमार्गापैकी १४० कि.मी. भाग जालना लोकसभा मतदारसंघातील आहे. या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी चार कोटी ३५ लाख रुपये खर्चास रेल्वे खात्याने मंजुरी दिलेली आहे. अजिंठा डोंगर करून हा रेल्वे मार्ग करावयाचा आहे.
१०० कोटी रुपये खर्च करून रेल्वेगाडय़ांची देखभाल दुरुस्ती आणि स्वच्छतेसाठी जालना येथे होणाऱ्या ‘पीट लाईन’चा उल्लेख करून दानवे म्हणाले,की मराठवाडय़ातील रेल्वेविषयक मागण्या मला माहीत आहेत, कारण गेली अनेक वर्षे आपणच या मागण्या करीत होतो. मराठवाडय़ातील रेल्वे विकासाच्या संदर्भात तीन कार्यक्रम आपण घेतले. आणखी पाच कार्यक्रम करायचे आहेत. रेल्वे राज्यमंत्री झाल्यापासून या संदर्भात मागण्यांवर आपले बारीक लक्ष आहे. रेल्वेस मालवाहतुकीतून उत्पन्न मिळते. प्रवासी वाहतुकीत रुपयामागे ४८ पैेसे तोटा होत असला तरी जनतेच्या सुविधेसाठी या गाडय़ा चालवाव्या लागतात. त्यासाठी मालवाहतूक गतीने व्हावी यासाठी ‘लॉजिस्टिक कॉरिडॉर’ चा विचार रेल्वे खात्याने केला असल्याचे दानवे म्हणाले.
- मराठवाडा ‘मध्य रेल्वे’स जोडा – डॉ. कराड
या कार्यक्रमात दक्षिण मराठवाडा विभाग ‘दक्षिण-मध्य रेल्वे’मधून काढून ‘मध्य रेल्वे’स जोडण्याची अपेक्षा व्यक्त करताना अर्थराज्यमंत्री डॉ. कराड व्यासपीठावरील रेल्वेच्या नांदेड विभागीय व्यवस्थापक उपेंद्रसिंह यांना उद्देशून म्हणाले, ‘चार वेळेस फोन केला तर एकदा प्रतिसाद मिळतो आणि त्यानंतर दुर्लक्ष केले जाते. मराठवाडा मध्य रेल्वेस जोडला तर हा अन्याय होणार नाही.’ खासदार संजय जाधव यांनीही दक्षिण-मध्य रेल्वेच्या कारभारावर टीका केली. दक्षिण-मध्य रेल्वेस मराठवाडय़ाशी काही देणे-घेणे नसते. पूर्णा येथे रेल्वेची २०० एकर जागा असून रेल्वेची शाळा, महाविद्यालय, दवाखाना आहे. जेवढय़ा गाडय़ा पूर्णा स्थानकातून जातात तेवढय़ा नांदेडमधून जात नाहीत. परंतु रेल्वेच्या संदर्भात नांदेडचे महत्त्व वाढविण्याचे काम होत आहे, असेही खासदार जाधव म्हणाले.