“सर्वात निष्क्रिय मंत्री म्हणून इतिहासात उद्धव ठाकरेंची नोंद होईल”- खासदार निलेश राणे
![“सर्वात निष्क्रिय मंत्री म्हणून इतिहासात उद्धव ठाकरेंची नोंद होईल”- खासदार निलेश राणे](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/Uddhav-Thakceray.jpg)
मुंबई |
राज्यात १०५ नगरपंचायत आणि भंडारा गोदिंया जिल्हापरिषद निवडणुकांसाठी आज मतदान पार पडत आहे. याच निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महाविकास आघाडीमधील पक्ष आणि विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपाकडून एकमेकावर टीका टिप्पणी केली जात आहे. अशाचप्रकारची टीका भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलीय. सर्वात निष्क्रिय मंत्री म्हणून इतिहासात उद्धव ठाकरेंची नोंद होईल असं निलेश राणे म्हणालेत.
“भारतीय जनता पार्टीला या (तालुक्यातील) सगळ्या म्हणजेच चारही नगरपंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या मताधिक्य मिळेल. आमचे सगळे नगरसेवक जिंकतील. आमच्या चारही नगरपंचायती मोठ्या फरकाने निवडून येतील याची मला खात्री आहे. विरोधकांनी किती भानगडी लावायचा प्रयत्न केला कितीही भांडणे लावायचा प्रयत्न केला तरी त्यांची उंची आणि अक्कल तेवढीच असल्याने ते फक्त भानगडी लावायचा प्रयत्न गेली दोन दिवसापासून करत आहेत. मात्र आमचे कार्यकर्ते जनतेला त्रास होऊ नये, निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी शांत राहून जनतेमध्ये राहून काम करत आहेत,” असं निलेश राणे यांनी कुडाळ येथे पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.
“आपल्याला विकास हवा आहे. भांडण नकोयत. मात्र शिवसेना असेल किंवा विरोधक असतील त्यांना भानगड हवीय, विकास नकोय, हाच फरक आहे. या चार पैकी एकही त्यांची नगरपंचायत नाहीय. त्यामुळे बोगस आमदाराने विजयाची वार्ता करू नये. येणाऱ्या निकालाच्या दिवशी चारही नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय होईल,” असा शब्दांमध्ये निलेश राणे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. “एवढ्या दिवस प्रचारामध्ये काय भाषण केले? भाषणांमध्ये त्यांनी किती निधी आणला हे सांगता आलं नाही. शेवटच्या दिवशी तुम्हाला सांगून उपयोग नाही. ते त्यांच्या पॅम्प्लेटमध्ये पाहिजे होतं. रस्त्यासाठी एवढं अमुक अमुक निधी, विकास कामांसाठी किती निधी आणला सांगू शकले नाहीत. मुख्यमंत्री शिवसेनेचे जरी असले तरी महाराष्ट्राला त्यांचा काही उपयोग नाही. ४० दिवस घरी बसले आणि स्वतःचा चार्ज देखील कोणाला दिलेला नाही असे मुख्यमंत्री महाराष्ट्राचा कामाचे नाहीत. त्यांचे आमदारच काय कामाचे आहेत? त्यामुळेच तुम्ही मुख्यमंत्र्याच्या वार्ता करू नका. निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून जर कोणाची नोंद इतिहासात झाली तर ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची होईल,” अशी टीका निलेश राणे यांनी केली.