गटाराची भिंत अंगावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन मजूर मृत्युमुखी
ठेकेदारावर गुन्हा दाखल, नवलाख उंब्रे येथे तळेगाव इंडस्ट्रीयल पार्कमधील घटना
तळेगाव दाभाडेः गटाराची भिंत अंगावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन मजूर मृत्युमुखी पडले, तर एक जण जखमी झाला. ही घटना नवलाख उंब्रे येथे तळेगाव इंडस्ट्रीयल पार्कमध्ये १ जून रोजी घडली. या प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गटाराची भिंत अंगावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन मजूर मृत्युमुखी पडले, तर एक जण जखमी झाला. ही घटना नवलाख उंब्रे येथे तळेगाव इंडस्ट्रीयल पार्कमध्ये १ जून रोजी घडली. या प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रघुनाथ बसावंत साहु आणि शंकर किस्तापा राठोड अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघा मजुरांची नावे आहेत. मोनेश व्यंकटेश पवार (वय २९, रा. १६ नंबर गल्ली, वडगाव धायरी) असे गुन्हा दाखल केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे.
अमरेश उमापती चव्हाण (वय २८, रा. म्हाळसकर, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हा १ जून रोजी तळेगाव इंडस्ट्रीयल पार्क येथे फिर्यादी व मयत यांच्याकडून कंपनीच्या गटारीच्या भिंतीस असणार्या सिमेट ब्लॉकला प्लास्टर करण्याचे काम करून घेत होता. यावेळी अचानक भिंत कोसळली. त्याखाली सापडून तिघे मजूर गंभीर जखमी झाले. त्यांना तळेगाव जनरल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रघुनाथ आणि शंकर यांचा मृत्यू झाला. आरोपीने मजुरांना डोक्यात हेल्मेट व अंगात रिप्लेक्ट जॅकेट व सेफ्टी बूट अशी कोणतीही सुरक्षेची साधने न देता निष्काळजीपणा केला. फौजदार रेळेकर तपास करीत आहेत.





