मुंबईतील 28 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
![Transfers of 28 police officers in Mumbai](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/Mumbai-Police-696x470.png)
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
मुंबईतील पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मुंबई उपनगरीय पोलीस अधिक्षक, पोलीस उपायुक्त स्तरावरील 28 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी काढले आहेत. यापैकी काही अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते, तर त्यांना त्यांच्या नियुक्तीच्या नव्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे पदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांच्या विरोधात मुंबई आणि ठाण्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल झाले होते. त्या गुन्ह्यांमध्ये पोलीस उपायुक्त पराग मणेरे, अकबर पठाण आणि दीपक देवराज या अधिकाऱ्यांची देखील नावे होती. अकबर पठाण यांची बदली नाशिकमधून मुंबई परिमंडळ 3 या ठिकाणी करण्यात आली आहे. मविआ सरकारने या तिन्ही अधिकाऱ्यांची मुंबई बाहेर साईड पोस्टिंग केली होती. तर मणेरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.
बालसिंग राजपूत यांना मुंबई सायबर गुन्हे विभागाचा पदभार देण्यात आला असून हेमराज राजपूत यांना मुंबई परिमंडळ सहाचे उपायुक्त पद देण्यात आले आहे. तर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांना आर्थिक गुन्हे शाखेचा आणि प्रकाश जाधव यांना अमली पदार्थविरोधी पथक उपायुक्तपदाची नियुक्ती देण्यात आली आहे.
दरम्यान, प्रज्ञा जेडगे यांची सशस्त्र पोलीस ताडदेव, योगेशकुमार गुप्ता यांची जलद प्रतिसाद पथक, शाम घुगे यांची सुरक्षा, नितीन पवार यांची सशस्त्र पोलिस कोळे कल्याण कलिना, अभिनव देशमुख यांची परिमंडळ 2 सह एकूण 28 अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.