तिरुपती बालाजीच्या लाडू प्रकरणावरुन दोन दिग्गज अभिनेते आमने-सामने
पवन कल्याण यांची ‘सनातन धर्म रक्षा मंडळ’ स्थापन करण्याची मागणी
तिरुपती : तिरुपती बालाजीच्या लाडू प्रकरणावरुन दोन दिग्गज अभिनेते आमने-सामने आले आहेत. तिरुपती मंदिरातील प्रसादात भेसळ करण्यावरून या दोन दिग्गज कलाकारांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. अभिनेता प्रकाश राज यांनी तिरुपती मंदिर प्रसाद प्रकरणात 11 दिवसांचे ‘प्रायश्चित’ करणारे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यावर टिका केली आहे. अभिनेते प्रकाश राज यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, हा मुद्दा तुम्हाला राष्ट्रीय स्तरावर का न्यायचा आहे. देशात आधीच खूप जातीय तणाव आहे. त्यावर पवन कल्याण यांनी उत्तर दिले आहे.
पवन कल्याण यांनी प्रकाश राज यांना प्रत्युत्तर
प्रकाश राज यांच्या या वक्तव्यावर पवन कल्याण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवन कल्याण म्हणाले की, “मी या विषयांवर का बोलू नये? प्रकाश राज, मी तुमचा आदर करतो, आणि जेव्हा धर्मनिरपेक्षतेचा प्रश्न येतो तेव्हा ते परस्पर असले पाहिजे. तुम्ही माझ्यावर का टीका करत आहात हे मला समजत नाही? मी याबद्दल बोलू शकत नाही का? मी सनातन धर्माबद्दल खूप गंभीर आहे.
उपमुख्यमंत्री पवन कल्याण पुढे म्हणाले की, “माझ्यासाठी सनातन धर्म सर्वात महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक हिंदूने या प्रकरणी जबाबदारी घेतली पाहिजे. पवन कल्याण म्हणाले की, ‘अन्य कोणत्याही धर्मात असे घडले असते तर मोठे आंदोलन झाले असते. ‘
पवन कल्याण यांची ‘सनातन धर्म रक्षा मंडळ’ स्थापन करण्याची मागणी
काही दिवसांपूर्वी पवन कल्याण यांनी सांगितले होते की, राष्ट्रीय स्तरावर ‘सनातन धर्म रक्षा मंडळ’ स्थापन करण्याची वेळ आली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर पोस्ट केले होते की, “तिरुपती बालाजी प्रसादमध्ये प्राण्यांच्या चरबीची (फिश ऑइल, डुकराची चरबी आणि म्हशीची चरबी) भेसळ आढळून आल्याने आम्ही सर्वजण अतिशय अस्वस्थ झालो आहोत. कदाचित संपूर्ण भारतातील मंदिरांशी संबंधित सर्व समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘सनातन धर्म रक्षा मंडळ’ स्थापन करण्याची वेळ आली आहे.”
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी हा मुद्दा सर्वात आधी उपस्थित केला होता. यानंतर राष्ट्रीय स्तरावर याची दखल घेतली गेली. केंद्र सरकारने चौकशीचे आदेश दिले होते. आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी देखील हे गंभीर असल्याचे म्हटले आहे.





