फिरायला गेलेल्या तीन मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू
![Three children drowned while walking in a field](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/aurangabad-lake.jpeg)
औरंगाबाद |
औरंगाबाद शहराजवळील शेकापूर शिवारातील एका शेततळयात बुडून तीन मुलांचा मृत्यू झाला. हे तिघेही गावाशेजारी सायकलवरून फिरायला गेले होते. हे तिघे शेततळ्यात कसे पडले याबद्दल अद्याप फारशी माहिती उपलब्ध नाही. सोमवारी सकाळी शेततळ्यात पडून मृत पावलेल्या तीन मुलांची नावं प्रतिक आनंद भिसे (वय१५), तिरूपती मारूती दळकर (१५) व शिवराज संजय पवार (वय १७, सर्व रा. सारा संगम, बजाजनगर), अशी असल्याची माहिती दौलताबाद पोलीस ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे यांनी दिली.
मृत तिघेही सायकलवर भांगसीमाता गडाकडे फिरण्यासाठी आले होते. भांगसीमाता गडाच्या पायथ्याच्या नजीकच्या शेकापूर शिवारातील गट नं. ८ मधील नारायण हरिश्चंद्र वाघमारे यांच्या शेतातील शेततळ्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला. तिघांचेही मृतदेह बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक आडे यांनी दिली.