मे महिना कडक उन्हाचा, यंदाही उष्णतेची लाट येणार
![This year too there will be a heat wave](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/heat-wave-780x470.jpg)
पुणे : यंदा मे महिन्यात उष्म्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र एका अहवालात असं सांगण्यात आलं आहे, की देशाच्या अनेक भागांमध्ये मे महिन्यात कडक उन्हाचा तडाखा सहन करावा लागू शकतो. ही उष्णता इतकी जास्त असेल, की त्यामुळे वीज नेटवर्कदेखील प्रभावित होऊ शकतं.
अर्थव्यवस्थेला हानी पोहोचू शकते आणि नागरिकांचं जीवनही धोक्यात येऊ शकतं. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजाचा संदर्भ देत ब्लूमबर्गने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. या वृत्तानुसार, देशाच्या पूर्व-मध्य आणि पूर्व भागात मासिक कमाल तापमान सर्वसाधारणपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
तापमान वाढल्याने उष्मा धोकादायक ठरतो. कारण, तापमानवाढीमुळे आपलं शरीर थंड ठेवणं शक्य होत नाही. या वर्षी तीव्र उष्णतेचा सामना करणारा भारत हा एकमेव देश नाही. थायलंड आणि बांगलादेशातही तापमान वाढत आहे. चीनचा युनान प्रांत दुष्काळाचा सामना करत आहे.