“राष्ट्रवादी व काँग्रेसने शिवसेनेला मोठ्या मनाने सांभाळून घेतलंय, हे त्यांनी लक्षात घ्यावं”
![They should realize that NCP and Congress have taken care of Shiv Sena with a big heart.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/hasan-mushrif-1.jpg)
मुंबई |
शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून राजकीय वर्तुळात चर्चेला विषय मिळाला आहे. या पत्रावरून वेगवेगळे तर्कविर्तक लावले जात आहे. सर्वच पक्षांतून यावर प्रतिक्रिया येत असून, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही महत्त्वाचं भाष्य केलं आहे. “आमदार प्रताप सरनाईक आणि परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बमुळे राज्य सरकारवर कोणताच परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आहे”, असा दावा हसन मुश्रीफ यांनी सोमवारी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केला. हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधला. सरनाईक यांच्या पत्रकात दोन्ही काँग्रेसकडून शिवसेनेचे पदाधिकारी फोडले जात असल्याचा आरोप केला आहे, असा प्रश्न मुश्रीफ यांना विचारण्यात आला. यावर बोलताना मुश्रीफ म्हणाले, “स्थानिक पातळीवर काही शिवसैनिक दोन्ही काँग्रेसमध्ये आले असतील.
मात्र मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते फोडण्याचे प्रकार घडलेले नाही. उलट कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे सदस्य कमी असतानाही जिल्हा परिषदेत सर्वाधिक पदे दिली. गोकुळ दूध संघातही त्यांना स्थान दिले. दोन्ही काँग्रेसने शिवसेनेला मोठ्या मनाने सांभाळून घेतले आहे, ही बाब त्यांनी लक्षात घ्यावी. उभय काँग्रेसमध्ये मात्र एकमेकांचे कार्यकर्ते ओढून घेण्याचे सत्र कायमच सुरू असते,” असे मिश्किल भाष्य त्यांनी केले. “शिवसेनेचे मुख्यमंत्री असल्याने त्यांच्या आमदारांची कामे झाली तर कोणाला वाईट वाटण्याचे कारण नाही”, असंही ते म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. याबाबत मुश्रीफ म्हणाले, “राज्यात करोनाचा संसर्ग अजूनही आहे. ७० टक्के लसीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत निवडणुका होणार नाही. त्यामुळे निवडणुकांवरून इशारे देण्यात अर्थ नाही”, असा टोला त्यांनी लगावला. प्रताप सरनाईक यांच्या पत्रानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भूमिकेचं स्वागत केले आहे, असा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. यावर मुश्रीफ म्हणाले, “त्यांना कधी एकदा सत्तेवर येऊ असे झाले आहे. त्यांच्यातील अस्वस्थता यातून व्यक्त झाली आहे,”असं ते म्हणाले.