पुलावरुन तोल गेल्याने युवती दुचाकीसह पाण्यात गेली वाहून
![The young woman fell into the water along with the bike after falling off the bridge](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/death.jpg)
नाशिक – निफाड तालुक्यातील उगाव येथील पुलावरून दुचाकीवरून जात असताना तोल जाऊन पडल्याने महाविद्यालयीन युवती वाहनासह पाण्यात वाहून गेली. स्थानिकांनी धाव घेऊन तिला बाहेर काढले. परंतु, तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. सोमवारी सकाळी सात वाजता ही घटना घडली.
तन्वी विजय गायकवाड (१७) असे या मुलीचे नाव आहे. निफाड तालुक्यातील रुई हे तिचे मूळ गाव आहे. शिक्षणासाठी ती शिवडी येथे आजोबा भाऊसाहेब क्षिरसागर यांच्याकडे वास्तव्यास होती. सकाळी तन्वी स्कुटीवरून महाविद्यालयात जाण्यास निघाली. उगाव येथील पुलावरून जात असताना तोल जाऊन ती पाण्यात पडली. मुसळधार पावसामुळे सध्या अनेक नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहे. ती दुचाकीसह पाण्यात वाहून गेली. स्थानिक ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी धाव घेतली. काही वेळात तिला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. तातडीने तिला निफाडच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तत्पुर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या बाबतची माहिती निफाड तहसीलदार कार्यालयाने दिली.