TOP Newsमहाराष्ट्र

वशिष्टी नदीतील गाळ, बेटे काढण्याचे काम तीन टप्प्यात होणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

– उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

– कोकणातील पूरस्थिती नियंत्रणासाठी अनेक महत्वाचे निर्णय

मुंबई l प्रतिनिधी

कोकणातील नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठल्यामुळे त्यांची वहनक्षमता कमी झाली आहे. अतिवृष्टीमुळे होणाऱ्या पूरस्थितीचा फटका नदीकाठावरील गावांना, शहरांतील नागरी वस्त्यांना वारंवार बसत आहे. नदीकाठच्या शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. महाड, चिपळूण, संगमेश्वरसह कोकण विभागात अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे नदीकाठच्या शहरांचे, गावांचे दरवर्षी होणारे नुकसान टाळण्यासाठी कोकणातील नदीपात्रातील गाळ, बेटे काढण्याचे काम युद्धपातळीवर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. या कामासाठी आवश्यक निधी जलसंपदा विभागाला तातडीने वर्ग करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यानीं दिल्या.

कोकणातील नदीकाठच्या शहरातील पूरस्थितीसंबंधात उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदामंत्री जयंत पाटील, ऊर्जामंत्री नितीन राऊत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री अस्लम शेख, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार शेखर निकम, चिपळूण बचाव समितीचे प्रतिनिधी राजेश वाजे, शाहनवाज शाह आदी मान्यवरांसह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, कोकणातील नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठला असून अनेक ठिकाणी गाळाची बेटे तयार झाली आहेत. त्यामुळे नद्यांची वहन क्षमता कमी झाली आहे. कोकणात मूळात पावसाचे प्रमाण जास्त असते. गेल्या काही वर्षात कोकणाला सातत्याने अतिवृष्टीचा फटका बसत आहे. यामुळे कोकणातील नद्यांच्या काठी पुरस्थिती निर्माण होऊन शहरे, गावातील नागरी वस्त्यांचे, नदीकाठच्या शेतजमिनींचे नुकसान होत आहे. वारंवार होणारे हे नुकसान टाळण्यासाठी कोकणातील नद्यांमधील गाळ, बेटे काढण्याचे काम युद्ध पातळीवर करावे. त्यासाठी आवश्यक असणारा निधी जलसंपदा विभागाला तातडीने वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

चिपळूण शहराला असणारा पुराचा धोका टाळण्यासाठी वशिष्टी नदीतील गाळ, बेटे काढण्याचे काम तीन टप्प्यात करण्यात येणार आहे. हे काम वेगाने आणि सुनियोजित पध्दतीने होण्यासाठी एकाच वेळी अनेक ठिकाणी कामांना सुरुवात करण्याच्यात सूचना देण्यात आल्या. या कामासाठी आवश्यक असणारा निधी तातडीने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हे काम वेगाने पूर्ण होण्यासाठी जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागात आवश्यक अत्याधुनिक यंत्रसामुग्रीची खरेदी करण्यात येणार आहे. नदीतील गाळ व त्यामुळे तयार झालेली बेटे काढल्यानंतर नदीची वहन क्षमता वाढणार असून नदीकाठच्या गावांचा, शहरांचा पुराचा धोका कमी होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button