कोल्हापूरच्या 480 ग्रामपंचायतींचे बिगुल वाजले! प्रभाग रचना जाहीर
![The trumpets of 480 gram panchayats of Kolhapur sounded! Ward structure announced](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/election-2-1.jpg)
कोल्हापूर | प्रतिनिधी
जिल्ह्यातील 480 ग्रामपंचायतींचे बिगुल वाजले आहेत. या ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना काल प्रसिद्ध करण्यात आली. महापालिका, नगरपालिकांपाठोपाठ आता ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रभाग रचनेचे काम सुरू झाल्याने यंदाचे वर्ष निवडणुकीच्या धामधुमीचेच ठरणार आहे. 25 मार्च रोजी जिल्हाधिकारी ही प्रभाग रचना अंतिम करणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीत निवडणुका न झालेल्या 5 आणि जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्या 475 अशा एकूण 480 ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार सर्व तहसीलदारांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील निवडणूक होत असलेल्या गावांची प्रारूप प्रभाग रचना आज जाहीर केली. या प्रभाग रचनेवर 4 मार्चपर्यंत हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. 15 मार्चपर्यंत प्रांताधिकार्यांकडे या हरकतींवर सुनावणी घेतली जाईल. सुनावणीनंतर 21 मार्चपर्यंत हे सर्व प्रस्ताव प्रांताधिकारी अंतिम मान्यतेसाठी जिल्हाधिकार्यांकडे सादर करणार आहेत. यानंतर 25 मार्च रोजी जिल्हाधिकारी या ग्रामपंचायतींचे सर्व प्रभाग अंतिम करणार आहेत. गटातटांच्या अस्तित्वासाठी ग्रामपंचायत निवडणुकांत मोठा सत्ता संघर्ष असतो. यामुळे निवडणुकीसाठी सोयीचा प्रभाग हा त्यातील सर्वाधिक महत्त्वाचा भाग आहे.