प्रियकराचा अचानक झाला मृत्यू; नैराश्यातील तरुणीने गोदावरीत उडी घेत संपवलं जीवन
![प्रियकराचा अचानक झाला मृत्यू; नैराश्यातील तरुणीने गोदावरीत उडी घेत संपवलं जीवन](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/प्रियकराचा-अचानक-झाला-मृत्यू-नैराश्यातील-तरुणीने-गोदावरीत-उडी-घेत-संपवलं.jpg)
औरंगाबाद : प्रियकराचा अपघाती मृत्यूने झाल्याने नैराश्यात गेलेल्या २२ वर्षीय प्रेयसीने गोदावरी नदीत उडी घेत आत्महत्या केली आहे. व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवत सदर तरुणीने नदीत उडी घेतली होती. दोन दिवसानंतर कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह कायगाव येथे आढळला आहे. दिव्या अनिल दंडे (रा.बाबरगाव ता. गंगापूर) असे मृत तरुणीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्या दंडे हिचा घटस्फोट झाला होता. ती गंगापूर येथे आई-वडिलांकडेच राहून ब्युटी पार्लरचा व्यवसाय करत होती. तिचे एका मुलावर जीवापाड प्रेम होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्या प्रियकरचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. तेव्हापासून दिव्या मानसिक तणावात होती. त्यानंतर ९ जूनपासून ती अचानक बेपत्ता झाली. दिव्या बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाईकांकडून देण्यात आली होती.
नातेवाईकांकडून तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. त्यानंतर कायगाव येथील गोदावरी नदीत मासेमारी करणाऱ्या व्यक्तींना एका तरुणीचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आल्याने त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह नदीतून बाहेर काढला आणि मिसिंग रिपोर्टवरून दिव्यांची ओळख पटवीत तिच्या नातलगांना बोलावून घेतले. दरम्यान, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने नदीकाठीच शवविच्छेदन करण्यात आले. नातेवाईकांच्या इच्छेवरून दिव्याचे अंत्यसंस्कारही तेथेच झाले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.