बागेश्वर धामचे पिठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री अखेर तुकोबा चरणी नतमस्तक..!
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या बद्दल केलेल्या टिप्पणी बद्दल मागितली माफी
![Bageshwar Dham, Pithadhishwar, Dhirendra Shastri, Tukoba Charani, Natmastak..!,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Bageshwar-dham-780x470.jpg)
देहूरोड : बागेश्वर धामचे पिठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी अखेर देहूतील मंदिरात येऊन जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. काही दिवसांपूर्वी धीरेंद्र शास्त्री यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त टिप्पणी केली होती, यावरून वाद रंगला होता. पुण्यात सुरू असलेल्या त्यांच्या कार्यक्रमाला देखील वेगवेगळ्या संघटनांनी विरोध दर्शवला. अखेर त्यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या बद्दल केलेल्या टिप्पणी बद्दल माफी मागत संत तुकाराम महाराज हे भगवानाचे रूप असल्याचे म्हटले आहे.
संत तुकाराम महाराजांच्या बद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे अडचणीत आलेल्या बागेश्वर धामचे वीरेंद्र शास्त्री अखेर संत तुकाराम महाराजांच्या चरणी लीन झाले आहेत. आज देहू मध्ये येत त्यांनी तुकाराम महाराजांचे दर्शन घेत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दर्शनानंतर बोलताना त्यांनी महाराजांचे दर्शन घेवून मोठे समाधान झाल्याची भावना व्यक्त केली. त्यांनी तपाच्या जोरावर बुडालेली गाथा नदीतून वर आणल्याचे सांगतानाच संतांचा आशिर्वाद लाभल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण होईल असे ही ते म्हणाले.