‘मी ज्याच्यासाठी तुम्हाला सोडलं तो…’, प्रेमविवाह करणाऱ्या तरुणीची आत्महत्या, सुसाईड नोट वाचून हादराल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/committed-suicide-by-jumping-under-a-train.jpg)
औरंगाबाद |
शहरातील विष्णूनगर भागात मनाला हेलवणारी घटना समोर आली असून तीन वर्षांपूर्वी आई-वडिलांच्या विरोधात जाऊन प्रेम विवाह करणाऱ्या २१ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पती पूर्वीसारखा वागत नाही त्यात आई-वडिलांनी सुद्धा नातं तोडलं, त्यामुळे एकट्या पडलेल्या या तरुणीने आपलं जीवन संपवलं असल्याचं तिने लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहलं आहे. पूजा आकाश खेडकर (२१, रा. विष्णूनगर) असे मृत तरुणीचे नाव आहे.
पूजाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहलं आहे की, ‘मी एकटी झाले. मी त्याच्यासाठी कुटुंब सोडले. पण त्याच्या कुटुंबानेदेखील मला तितके स्वीकारले नाही. आई-पप्पा मी तुम्हाला विसरू शकत नाही. मी ज्याच्यासाठी सोडलं, तेथूनदेखील अपेक्षा अपूर्ण राहिल्या. मी आता रडू शकत नाही. मी तुम्हाला खूप त्रास दिला. मला माफ करा. मृत्यूची घटना आई-वडिलांना कळवावी, मात्र ते येणार नाहीत. यामुळे आकाशनेच अग्निडाग द्यावा’, अशी इच्छा पूजाने सुसाईड नोटमध्ये व्यक्त केली आहे.
- तीन वर्षांपूर्वी झाला होता प्रेमविवाह…
पूजा ही वयाच्या १७ व्या वर्षी आकाशसोबत पळून गेली होती. त्यानंतर पोलीसांनी तिला शोधून आणले असता तिने आई-वडिलांसोबत जाण्यास नकार दिला. मात्र, ती अल्पवयीन असल्याने बाल न्याय मंडळाच्या आदेशाने पूजाला एक वर्ष सुधारगृहात ठेवले होते. त्यानंतर १८ वर्षांची झाल्यानंतर २०१९ मध्ये आकाश आणि पूजाने प्रेमविवाह केला. मात्र, तेव्हापासून आई-वडिलांनी पूजासोबतच नातं तोडलं होतं. विशेष म्हणजे पूजाच्या मृत्यूची माहिती पोलिसांनी जाफराबाद तालुक्यात राहणाऱ्या तिच्या आई-वडिलांना कळविली, पण पूजाच्या आई- वडिलांनी तिच्या प्रेताकडे पाठ फिरवल्याचा पाहायला मिळालं.