शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक, काही वर्षापूर्वी केला होता भाजपात प्रवेश
![The main accused in the Sharad Mohol murder case was arrested](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Sharad-Mohal-780x470.jpg)
पुणे | कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पुण्यात भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली आहे. प्रतिस्पर्धी टोळीतल्या विठ्ठल शेलार आणि रामदास मारणे यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या हत्येप्रकरणी तपास केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने नवी मुंबईतल्या वाशीजवळच्या डान्सबारमधून विठ्ठल शेलार आणि इतर पाच जणांना रविवारी (१४ जानेवारी) ताब्यात घेतलं. त्यानंतर या पाचही आरोपींना पुणे गुन्हे शाखेच्या ताब्यात दिलं आहे. पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणी १४ जणांना अटक केली आहे.
हेही वाचा – मकर संक्रांतीला तीळ गूळ का खाल्ला जातो? जाणून घ्या यामागचे कारण
शरद मोहोळ हत्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला गुंड विठ्ठल शेलार याची काही वर्षांपूर्वी भाजपाच्या युवा शाखेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. शेलार याने २०१७ मध्ये पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट आणि पुणे भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर बापट आणि भेगडे यांनी शेलार याची पक्षाच्या युवा अध्यक्षपदी नियुक्ती केली होती.
शेलार हा मुळचा मुळशी तालुक्यातील उरवडे गावचा रहिवासी आहे. त्याच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, अपहरण आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. २०१४ मध्ये त्याच्यावर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्याला अटकही झाली होती. २०१७ मध्ये त्याची जामीनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर काहीच दिवसांत त्याने भाजपात प्रवेश केला. शेलारव्यतिरिक्त शरद मोहोळ याच्या पत्नीनेदेखील अलीकडेच भाजपात प्रवेश केला आहे.