दोन महिन्यापूर्वीच रुग्णालयाचे झाले उद्घाटन; दोन्ही डॉक्टर निघाले बोगस
![The hospital was inaugurated two months ago; Both doctors went bogus](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/The-hospital-was-inaugurated-two-months-ago-Both-doctors-went-bogus.jpg)
हिंगोली | सेनगाव येथे दोन महिन्यापूर्वीच थाटामाटात उद्घाटन झालेल्या रुग्णालयातील दोन्ही डॉक्टर बोगस निघाले असून या प्रकरणी दोघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. १८ ) रात्री आठ वाजता फसवणुकीसह महाराष्ट्र वैद्यकिय व्यवसाय अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. ज्ञानबा केशवराव टेकाळे (रा. केसापूर), माधव बी. रसाळ (रा. हाताळा, ता. सेनगाव) अशी त्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव येथे सुमारे २ महिन्यापूर्वीच एका खाजगी रुग्णालयाचे थाटामाटात उद्घाटन झाले. त्यासाठी राजकीय मंडळींसह प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. या ठिकाणी रितसर उद्घाटन झाल्यानंतर रुग्णालयातील दोन्ही डॉक्टरांबाबत शंका व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार निमा संघटनेने या संदर्भात तक्रारही केली होती.
दोघांविरूद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणात चौकशी झाल्यानंतर दोघांचेही वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर आज वैद्यकिय अधिक्षक डॉ. सचिन राठोड यांनी सेनगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये ज्ञानबा टेकाळे व माधव रसाळ यांच्याकडे वैद्यकीय व्यवसायाची पदवी नसताना बनावट प्रमाणपत्र तयार करून बोगस वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समिती तसेच नगरपंचायतस्तरीय समितीच्या चौकशीत आढळून आल्याचे तक्रारीत नमुद केले आहे.
यावरून पोलिसांनी ज्ञानबा टेकाळे,माधव रसाळ यांच्या विरुध्द फसवणुकीसह महाराष्ट्र वैद्यकिय व्यवसासायिक अधिनियम १९६१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिक्षा लोकडे,जमादार अनिल भारती पुढील तपास करीत आहेत.