मुसळधार पावसाचा कहर! झाडाखाली थांबलेल्या दोन जिवलग मित्रांचा वीज पडून मृत्यू
![मुसळधार पावसाचा कहर! झाडाखाली थांबलेल्या दोन जिवलग मित्रांचा वीज पडून मृत्यू](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/मुसळधार-पावसाचा-कहर-झाडाखाली-थांबलेल्या-दोन-जिवलग-मित्रांचा-वीज-पडून.jpg)
औरंगाबाद : पावसाळा सुरू होताच औरंगाबाद जिल्ह्यात पावसासोबतच विजांचा तांडव पाहायला मिळत आहे. शनिवारी वीज पडून तिघांचा मृत्यू झाल्यानंतर काल आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पिंप्री सताळा परिसरात पाऊस येत असल्यानं झाडाखाली थांबलेल्या दोन युवकांवर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहनसिंग विजयसिंग शिंदे (वय-१६), रवी जनार्धन कळसकर (वय-२२) अशी मृत्यू पावलेल्या दोघांची नावे आहेत. विशेष म्हणजे हे दोघे जिवलग मित्र होते. याविषयी अधिक माहिती अशी की, रोहनसिंग आणि रवी हे दोघेही जिवलग मित्र होते. दोघे रविवारी त्यांच्या शेतात काम करत होते. दरम्यान, अचानक पावसाला सुरुवात झाली.
पावसाचा जोर वाढत असल्यामुळे दोघांनीही शेतातील लिंबाच्या झाडाखाली आसरा घेतला. दोघेही उभे असताना अचानक विजेचा कडकडाट झाला व झाडावर वीज कोसळल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. आजूबाजूच्या शेतातलीत शेतकऱ्यांनी धाव घेत दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याआधीच दोघेही गतप्राण झाले होते. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यानंतर त्यांचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दोन्ही जिवलग मित्रांचा अशा पद्धतीने अपघाती मृत्यू झाल्याने गावात एकच शोककळा पसरली आहे. मागील दोन दिवसांत औरंगाबाद जिल्ह्यात विज कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. येत्या काळात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आता ग्रामीण भागात वीजांपासून संरक्षण कसे मिळवावे यासाठी जनजागृती होणे गरजेचे झाले आहे.