“महाराष्ट्राचे राज्यपाल दुडूदुडू धावतायत, दम लागून पडतील”; संजय राऊतांचा टोला
!["The Governor of Maharashtra is running fast, he will catch his breath"; Tola of Sanjay Raut](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/Sanjay-Raut-Bhagat-Singh-Koshyari-1.jpg)
मुंबई |
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरुन राज्य सरकारने नाराजी जाहीर केली असून नव्या वादाला सुरुवात झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील राज्यपालांच्या दौऱ्यांवर टीका केली असून भाजपा राज्यपालांच्या माध्यमातून सत्ता राबवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल दुडूदुडू धावत असून दम लागून पडाल असा टोलाही त्यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान राज्य सरकारच्या टीकेनंतर त्यांच्या दौऱ्यात बदल करण्यात आल्याचंही बोललं जात आहे. यावेळी ते आढावा बैठक घेणार आहेत. यासंबंधी विचारलं असता संजय राऊत यांनी ही टीका केली. “ज्या राज्यात भाजपाची सरकारे नाहीत तिथे भाजपा राज्यपालांच्या माध्यमातून राज्य करण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्लीचे आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल त्याच पद्धतीने काम करत आहेत. महाराष्ट्राचे राज्यपालही त्याच पद्धतीने दुडूदुडू धावत आहेत. धावू द्या, काही हरकत नाही. दम लागून पडाल तुम्ही,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
संजय राऊत यांनी यावेळी पेगॅसस आणि शेतकरी आंदोलन मुद्द्यांवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. पेगॅसस, शेतकरी, महागाईच्या मुद्द्यावर बोलत नाही अशी टीका करत विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांची फक्त चमचेगिरी करावी का? अशी संतप्त विचारणा त्यांनी केली. विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांनी हातात हात घालून देशाचं काम करावं अशी आपली भूमिका असल्याचंही ते म्हणाले. सरकार कोणत्याच विषयावर बोलायला तयार नाही. सरकारला विरोधकांचा आवाजच ऐकायचा नाही, असा आरोपही त्यांनी केला.