इतिहासाच्या काळ्या खुणा पुसल्या गेल्या; मुख्यमंत्र्यांकडून सिंदूर पुलाचे लोकार्पण

मुंबई : भारतीयांना फसविणारा आणि अत्याचार करणारा अशी ओळख असेलेल्या कर्नाक या ब्रिटीश गव्हर्नरच्या नावाने मुंबईत असलेल्या दिडशे वर्षांपासूनच्या इतिहासाच्या काळ्या खुणा पुसत कर्नाक पुलाचे नामकरण ‘सिंदूर’ केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरील व पी. डी’मेलो मार्गाला जोडणाऱ्या या सिंदूर (पूर्वीचा कर्नाक पूल) रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढा, बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अपर आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा – कपिल शर्माच्या ‘कॅप्स कॅफे’वर गोळीबार; खालिस्तानी दहशतवादी हरजीत सिंह लड्डीने घेतली जबाबदारी
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात इतिहासातील काळी प्रकरणे संपली पाहिजेत, त्याच्या खुणा मिटल्या पाहिजेत असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याने कर्नाक पुलाचे नाव बदलले. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट केले. भारत पाकिस्तानात घुसून दहशदवादी अड्डे उद्धवस्त करू शकतो, हे दाखवून दिले. या सेनेच्या अतुलनीय कामगिरीमुळे सर्वांच्या मते महापालिकेने पुलाला ‘सिंदूर’ नाव दिले, याचा मला आनंद आहे. या पुलाची एकूण लांबी ३४२ मीटर असून रेल्वेच्या हद्दीत ७० मीटर इतकी असल्याने निश्चितच मुंबईतल्या वाहतुकीसाठी पूल अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रेल्वेवरचा पूल असल्याने आणि दाटीवाटीच्या ठिकाणी असल्याने अडचणींवर मात करून मुंबई मनपाने कमी वेळात ऐतिहासिक जुन्या कर्नाक पुलाचे उत्कृष्ट बांधकाम केल्याने मुख्यमंत्र्यांनी मनपाचे अभिनंदन केले. दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी सिंदूर पूल महत्त्वाचा आहे. मशीद बंदर परिसरात पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा विद्यमान मार्ग कायम ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने या पुलाची पुनर्बांधणी केली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार सिंदूर पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे.





