मुख्यमंत्र्यांनी स्वतः चिपळूणच्या बाजारपेठेत फिरून झालेले नुकसान पाहिले
![The Chief Minister himself saw the damage done in the Chiplun market](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/WhatsApp-Image-2021-07-25-at-13.08.49.jpeg)
मुंबई – काल महाडमधील तळीये गावची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. आज सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईहून हेलिकॉप्टरने चिपळूणकडे रवाना झाले. चिपळूण येथे दाखल होताच मुख्यमंत्र्यांनी चिपळूण बाजारपेठ येथे जाऊन व्यावसायिक, दुकानदार यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली, त्यांच्याशी बोलले. मुख्यमंत्र्यांनी स्वतः बाजारपेठेत फिरून पुराच्या पाण्यामुळे झालेले नुकसान पाहिले. बाजारपेठ परिसरात पुराच्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले होते. तसेच चिपळूण येथील हॉटेल अभिषेकमध्ये मुख्यमंत्री आढावा बैठकही घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत पालकमंत्री अनिल परब, सिंधुदुर्ग पालकमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित आहेत.
दरम्यान, आज केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर कोकण दौऱ्यावर आले असून त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संमतीने मी, देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्यासह रायगड जिल्ह्यातील तळीये, रत्नागिरीतील चिपळूण येथील दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी रवाना होत आहोत, असे ट्विट नारायण राणे यांनी दौऱ्याला निघण्यापूर्वी केले होते.