Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मंत्रिमंडळ विस्तार झाला; आता खातेवाटपासाठी खलबते

मुंबई : महायुती सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार अखेर रविवारी पार पडला. महायुतीतील तिन्ही पक्षांच्या अनेक माजी मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. तर काही इच्छुक आमदारांना डावलण्यात आले आहे. नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे मंत्रिमंडळात ४ महिला आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. दरम्यान, मंत्रीपद न मिळाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता खातेवाटपाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी खलबते झाली असून कोणाला कोणते खाते मिळणार?, महत्त्वाच्या खातेवाटपासाठी रस्सीखेच सुरू झाली असून खातेवाटप तरी लवकर होणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यातील महायुती सरकारने आपल्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक दिग्गजांना बाहेरचा रस्ता दाखवून नव्या चेहर्‍यांना संधी दिली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक पाच, भाजपने चार आणि शिवसेनेने तीन अशा एकूण बारा मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळातून वगळले आहे. तरुण नेतृत्वाला संधी देण्यासाठी, काही नेत्यांवरील गैरव्यवहाराचे आरोप, तर कुणाला पक्षसंघटनेतील जबाबदारीच्या निमित्ताने मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे.

हेही वाचा     –      ‘संजय राठोड यांना कायम आपला विरोध राहील’; चित्रा वाघ यांचं वक्तव्य

भाजपने सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित आणि सुरेश खाडे या चारजणांना वगळले आहे. मुनगंटीवार यांचा लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि विधानसभा निवडणुकीतही विजयासाठी झालेली दमछाक मंत्रिपदाच्या विरोधात गेली. त्यामुळे विदर्भात नवीन नेतृत्वाला संधी देण्याच्या निमित्ताने चंद्रशेखर बावनकुळे, आकाश फुंडकर आणि पंकज भोयर यांना पुढे आणण्यात आले आहे. यातून जातीय समीकरणांचेही संतुलन साधले गेले. शिवाय, मुनगंटीवारांनी विधानसभा अध्यक्षपदाला दिलेला नकारही त्यांना भोवल्याचे सांगितले जाते.

आदिवासी खात्यातील गैरव्यवहारांचे शिंतोडे दीर्घकाळ विजयकुमार गावितांवर उडत होते. त्यातच, त्यांची मुलगी हिना गावित यांनी लोकसभेतील पराभवानंतर बंडखोरी करत विधानसभा लढविली. पक्षाने कमी वयात दोनदा खासदारकी आणि घरात मंत्रिपद दिले असताना बंडखोरी झाली. त्यामुळे विजयकुमार गावितांना मंत्री पद नाकारण्यात आले. सुरेश खाडे यांच्याकडून मंत्रिपदास न्याय मिळाला नव्हता. फारसा प्रभाव टाकता न आल्याने खाडे यांना वगळण्यात आले.

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज असून त्यांनी स्वत: माध्यमांसमोर आज (दि. १६) उघड नाराजी व्यक्त केली. आपण नाराज असल्याचे स्पष्ट करतानाच मी सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावललं काय, फेकलं काय, काय फरक पडतो? मंत्रिपद किती वेळा आलं आणि गेलं छगन भुजबळ संपला नाही. जरांगेंना अंगावर घेतल्याचं बक्षीस मिळालं, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button