‘..म्हणूनच माझ्या आयुष्यात तुझं स्थान नेहमीच खास’, रोहित पवारांची लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट
!['..म्हणूनच माझ्या आयुष्यात तुझं स्थान नेहमीच खास', रोहित पवारांची लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/म्हणूनच-माझ्या-आयुष्यात-तुझं-स्थान-नेहमीच-खास-रोहित-पवारांची-लग्नाच्या.jpg)
पुणे : कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. रोहित पवार सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध विषयावर त्यांची भूमिका स्पष्ट करत असतात. आज रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नी कुंती पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना देखील शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित पवार यांनी फेसबूक आणि ट्विटरवर पोस्ट लिहून त्यांच्या आणि पत्नी कुंती यांच्यातील नात्यावर भाष्य केलं आहे. रोहित पवार यांनी त्यांच्या लग्नाला १२ वर्ष म्हणजेच एक तप पूर्ण झाल्याचं म्हटलंय. पवार यांनी सोशल मीडियाच्या माधमयातून पत्नीला शुभेच्छा देत पुढील वर्षानुवर्षे एकमेकांची साथ कायम राहणार असल्याचं म्हटलं. आहे.
- रोहित पवार यांची पोस्ट
माझ्या आयुष्यात ज्या दोन महिलांचा प्रभाव आहे, त्यात आई आणि तू आहेस. तुझी साथ तर फार मोलाची आहे. माझ्या प्रत्येक निर्णयात तू खंबीरपणे पाठीशी असतेस. उच्चशिक्षित असूनही स्वतःचं स्वप्न बाजूला ठेवून मुलं मोठी होईपर्यंत गृहिणी म्हणून काम करायचं तू ठरवलं.
मी सार्वजनिक जीवनात असल्याने मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही, म्हणून तू स्वतःहून हा निर्णय घेतलास. तो वरकरणी कितीही सोपा वाटत असला तरी प्रत्यक्षात मात्र किती अवघड आहे, याची मला जाणीव आहे. म्हणूनच माझ्या आयुष्यात तुझं स्थान नेहमीच खास आणि विशेष असं आहे आणि ते नेहमीच तसं राहील. आज आपल्या लग्नाला १२ वर्षे पूर्ण झाली. वैवाहिक आयुष्याच्या यशस्वी तपपूर्तीनिमित्त आणि पुढंही वर्षानुवर्षे एकमेकांची साथ अशीच कायम राहणार असल्याबद्दल Thank U #कुंती!
- रोहित पवार यांना कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून रोहित पवार कार्यरत आहेत. त्यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून देखील काम केलं आहे. सोशल मीडियावर देखील त्यांना मानणारा वर्ग आणि कार्यकर्ते आहेत. कार्यकर्त्यांकडून देखील रोहित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.